अत्याधुनिक क्रीडा संकुल-क्रीडांगणे विकसित करणार
पुणे : महापालिकेच्या क्रीडा विभागाने तयार केलेल्या क्रीडा धोरणाला स्थायी समितीच्या बैठकीत एकमताने मंजुरी देण्यात आली. स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
महापालिका शाळांमध्ये शिकणार्या 98 हजार 989 विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून हे धोरण तयार करण्यात आले असले, तरी शहरातील सर्वच खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी विविध घटकांचाही त्यात अंतर्भाव करण्यात आला आहे. महापालिका हद्दीतील क्रीडागंणासाठी आरक्षित जागांवर अत्याधुनिक क्रीडा संकुल-क्रीडांगणे विकसित करणे, क्रीडा स्पर्धा भरवणे, क्रीडा नर्सरी तयार करणे, स्वतंत्र क्रीडा माहिती विषयक कक्ष, उद्योन्मुख खेळाडूंना क्रीडा शिष्यवृत्ती देणे या योजनांचा अंर्तभाव या धोरणात करण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांमधील क्रीडा प्रकारांना चालना देण्यासाठी महापालिकेने क्रीडा धोरणात विविध योजना आखल्या आहेत. केंद्र सरकारच्या खेलो इंडिया’ या धोरणाला चालना देण्याचा प्रयत्नही या धोरणात करण्यात आला आहे. महापालिकेच्या तीन क्रीडा प्रबोधिनींमध्ये विद्यार्थ्यांना खेळाचे प्रशिक्षण दिले जाते. खेळाडूंना अत्याधुनिक सोयीसुविधा निर्माण करून देणे, त्यांची कसून तयारी करून घेऊन त्यांना स्पर्धेमध्ये उतरविणे, खेळांसाठीच्या उच्च दर्जाच्या सोयीसुविधा निर्माण करण्यात येणार आहे.
आरक्षित जागांवर अत्याधुनिक क्रीडा संकुल, क्रीडांगणे विकसित करून, या क्रीडांगणांवरील सुविधा शहरातील खेळाडूंना रास्त दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामध्ये विशेषत: व्यायामशाळा, बॅडमिंटन हॉल, लॉन टेनिस, जलतरण तलाव, रायफल शुटिंग केंद्र, बॉक्सिंग हॉल, कृत्रिम गिर्यारोहण भिंत, स्क्वॅश कोर्ट, बोट क्लब, मैदाने, स्केटिंग ग्राउंड, क्रीडा ग्रंथालये, तलवारबाजी केंद्र, धनुर्विद्याकेंद्र, वेटलिफ्टिंग सेंटर, हॉकीचे मैदान या खेळ प्रकारांचा समावेश आहे. कै. बाबूराव सणस मैदान येथे स्वतंत्र क्रीडा माहिती विषयक कक्ष तयार करून नागरिकांना क्रीडाविषयक माहिती सहज उपलब्ध करून देण्याचेही या धोरणात प्रस्तावित आहे.