महापालिका शिवसेना-भाजपविरुद्ध सर्व पक्षीय एकवटले

0

मुंबई । मुंबईतील विविध समस्यांबद्दल पालिकेतील शिवसेना आणि पहारेकरी म्हणून मिरविणारी भारतीय जनता पार्टी फक्त बघ्याची भूमिका घेत आहे. यामुळे मुंबईतील अनेक समस्यांबद्दल तसेच मुंबईकर जनतेच्या विरोधातील निर्णयांना विरोधी पक्ष म्हणून पालिकेतील सर्व विरोधकांना एकत्र येण्याची गरज असून शिवसेना-भाजपाला एकत्र विरोध केला पाहिजे. यासाठी पुढील दिवसांत मुंबईकर जनतेच्या हिताकरिता आक्रमक भूमिका घेण्यासाठी समाजवादी पार्टीचे गटनेते रईस शेख यांनी आवाहन केले आहे. पालिकेत शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष गेली दोन दशके सत्तेत आहेत. यावेळी भाजपने पहारेकर्‍यांची भूमिका घेत विरोधकांची भूमिकेचे नाटक करीत आहे. यामुळे पालिकेत तेव्हापासून राजकीय गुंतागुंत वाढली आहे.

भाजपचा केवळ शिवसेनेचे खच्चीकरण करून त्यांचा प्रभाव कमी करण्याचा डाव आहे. तर शिवसेनेला अंतर्गत गटबाजीने ग्रासले आहे. त्यात पालिकेतील विरोधी पक्षही एकदिलाने काम करत नसल्याने त्यांचाही वचक सत्ताधार्‍यांवर राहिलेला नाही. या सर्व परिस्थितीचा फायदा पालिका प्रशासन घेत असल्याचे रईस शेख यांचे म्हणणे आहे. मेलहोलमध्ये पडून मृत्यू पावलेले डॉक्टर अमरापूरकर प्रकरण, झाड पडून नाहक बळी गेलेली चेंबूरमधील महिला, घोड्यावरून पडल्यामुळे लहान मुलीचा झालेला दुर्देवी मृत्यू, मुंबईतील सोसायट्यांना कचरा वर्गीकरण करण्यासाठी दिलेल्या नोटीसा इत्यादी प्रकारणांवरून मुंबईकरांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष असून याचा पालिकेतील सत्ताधारी आणि प्रशासनाला विचारण्याची गरज आहे. याकरिता सर्व विरोधकांनी एकत्र येऊन मुंबईकर जनतेसाठी आक्रमक भूमिका घेऊया असे आवाहन रईस शेख सर्व विरोधी गटनेत्यांना पत्राद्वारे केले आहे.

मनसेचे संजय तुर्डे यांना गटनेता संबोधून पत्र
पालिकेतील मनसेचे सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर मनसेचे एकमेव नगरसेवक संजय तुर्डे यांना राज ठाकरे यांनी गटनेते बनविण्यासाठी महापौरांकडे पत्र दिले आहे. मात्र महापौरांकडून पालिका सभागृहात तुर्डे यांच्या नावाची गटनेतेपदासाठी घोषणा अद्याप झाली नसल्याने त्यांना गटनेते म्हणूंन अधिकृत मान्यता मिळालेली नाही. त्यामुळे रईस शेख यांनी तुर्डे यांना मनसेचे गटनेते म्हणून संबोधने चुकीचे असल्याची चर्चा पालिकेत होती.