पिंपरी-चिंचवड : महापालिकेच्या सहायक आयुक्तपदी स्मिता गंगाराम झगडे यांची नियुक्ती झाली आहे. त्यांच्याकडे ’ग’ क्षेत्रिय कार्यालयाचा कार्यभार देण्यात आला असून ’ड’ क्षेत्रीय कार्यालयाचा अतिरिक्त पदभार दिला आहे. त्या नवी मुंबई येथील विभागीय आयुक्त कार्यालय कोकण विभागात उपसंचालक होत्या. दरम्यान, झगडे या वर्षभरापूर्वी पिंपरी पालिकेत प्रतिनियुक्तवर आल्या होत्या. परंतु, त्यावेळी जागा रिक्त नसल्यामुळे पालिकेने त्यांना रुजू करुन घेतले नव्हते.
महापालिकेत 11 सहायक आयुक्त आहेत. त्यापैकी राज्य सरकारच्या सेवेतील 6 आणि पालिका सेवेतील 5 सहायक आयुक्त आहेत. राज्य सरकारच्या सेवेतील सहा आयुक्त होते. त्यापैकी दोन पदे रिक्त होती. आता एक पद रिक्त असून राज्य सरकारच्या सेवेतील ’सीईओ’ केडरचे प्रभारी अतिरिक्त आयुक्त प्रवीण अष्टीकर, प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त महेश डोईफोडे, आकाश चिन्ह व परवाना विभागाचे योगेश कडूसकर आणि भूमि आणि जिंदगी विभागाचे विजय खोराटे महापालिकेत कार्यरत आहेत. झगडे आल्यामुळे राज्य सरकारच्या प्रतिनियुक्तीवरील एक सहायक आयुक्तांचे पदे रिक्त आहे. दरम्यान, राज्य सरकारच्या सेवेतील आशा राऊत या प्रशासन अधिकारी म्हणून पालिकेत प्रतिनियुक्तीवर आहेत. त्यांच्याकडे ’ह’ क्षेत्रिय कार्यालयाचा पदभार देण्यात आला आहे.