महापालिका हद्दीत भूमिगत गटारींसाठी 90 कोटींची तरतूद

0

धुळे। धु ळे शहरातील भुयारी गटारी योजनेच्या प्रस्तावास अमृत योजनेंतर्गत मंजुरी मिळाली आहे. सांडपाणी वाहून नेण्यासाठी शहरातील विविध भागात 326 किलोमीटर भूमिगत गटारी बांधण्यात येणार आहे, अशी माहिती धुळे लोकसभा मतदार संघाचे खासदार तथा केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री ना.डॉ. सुभाष भामरे यांनी दिली आहे. महापालिका हद्दीतील पायाभुत नागरी सुविधा पुरवण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून हाती घेण्यात आलेल्या अमृत योजेनेअंतर्गत धुळे महापालिकेने शासनाला भुमिगत गटारी तयार करण्यासाठी प्रस्ताव सादर केला होता.

प्रस्तावासंदर्भात वरिष्ठांशी चर्चा
या संदर्भात मनपा आयुक्त संगिता धायगुडे आणि इतर अधिकार्यांनी या संदर्भात संरक्षण राज्यमंत्री ना.डॉ. भामरे यांच्याशी चर्चा करून शासनाला 219 कोटींचा प्रस्ताव सादर केला. महापालिकेचा प्रस्ताव आपल्या सुचनेनुसार त्यानुसार दाखल झाल्यानंतर ना.डॉ भामरे यांनी धुळ्यातील आरोग्य आणि शहर स्वच्छतेसह पायाभुत सुविधेसी निगडीत या भुमिगत गटार योजनेला मंजूरी मिळवण्यासाठी पाठपुरावा केला. या प्रस्तावासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय नगर विकास मंत्री ना.वैकय्या नायडू यांच्याकडे गेल्या एका वर्षापासून यशस्वी पाठपुरावा करुन त्यास मंजूरी मिळवली आहे. तसेच या भुमिगत गटार योजनेच्या कामासाठी पहिल्या टप्प्यात अर्थसंकल्पात 90 कोटींची तरतूद देखील करवून घेतली आहे.

पुढील महिन्यात निविदा
या योजनेमुळे धुळे शहरातील भूमिगत गटारींचे काम मार्गी लागले असून, शहरातील सांडपाण्याचा प्रश्‍न कायम स्वरुपी सुटणार आहे. या 219 कोटींच्या योजनेमध्ये केंद्र शासन 50 टक्के, राज्य शासन 25 टक्के आणि धुळे महानगरपालिका 25 टक्के वाटा उचलणार आहे, अशीही माहिती ना. डॉ. सुभाष भामरे यांनी दिली आहे. शहरात सांडपाण्यामुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत आहे. या योजनेमुळे हे प्रदूषण आटोक्यात येणार आहे. 90 कोटी रुपयांच्या निधीतून शहरात कुठली कामे प्राधान्याने करायची याचा अहवाल पाठविण्याच्या सुचना संबंधित विभागाला देण्यात आल्या आहे. या कामासाठी पुढील महिन्यात निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहितीही मिळाली आहे.