महापालिका 2019 पर्यंत जैवविविधतेसाठी पॉलिसी व ऍक्शन प्लॅन तयार करणार

0

अध्यक्षा उषा मुंढे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड महापालिका शहरात लवकरच जैवविविधतेचे सर्वेक्षण करणार आहे. त्यानुसार, जानेवारी 2019 पर्यंत महापालिका शहरातील जैवविविधतेसाठी पॉलिसी व ऍक्शन प्लॅन तयार करणार आहे. जैवविविधता समितीच्या अध्यक्षा उषा मुंढे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेमध्ये झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी समितीच्या सदस्या कमल घोलप, अर्चना बारणे, सुवर्णा बुर्डे, अनुराधा गोरखे तसेच महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, उद्यान अधिक्षक सुरेश साळुंखे, पर्यावरण विभागाचे अधिकारी संजय कुलकर्णी, चंद्रकांत कोंडे, दिग्वीजय पवार आदी उपस्थित होते.

अहवाल तयार करणार..

केंद्र शासनाच्या जैवविविधता व्यवस्थापन नियमानुसार महापालिकेमध्ये जैवविविधता समितीची स्थापना करण्यात आली आहे. त्याअंतर्गत महापालिका शहरात जैवविविधतेचे सर्वेक्षण करणार आहे. त्यासाठी टेरेकॉन इकोटेक या कंपनी या सल्लागार समितीची नेमणूक करण्यात आली आहे. हे सर्वेक्षण संपूर्ण शहर परिसरात जानेवारी 2019 च्या आधी पूर्ण करायचा असून त्याद्वारे शहरातील जैवविविधतेची सद्य स्थिती, त्यासाठी आवश्यक उपाय योजनांचा अहवाल तयार केला जाणार आहे. या अहवालानुसार महापालिकेची जैवविविधता समिती संरक्षण व संवर्धन प्रकल्प राबवणार आहे. या प्रकल्पांना भेटी देऊन त्यातून प्रगती जाणून घेतली जाणार आहे.

बाहेरील संस्थांची सल्लागार म्हणून निवड…

दरम्यान, या बैठकीला स्थानिक पातळीवर शहरातील जैवविविधतेसाठी काम करणार्‍या एकाही सामाजिक संस्थेला व तज्ज्ञाला बोलवण्यात आले नव्हते. त्यामुळे शहरातील स्थानिक पातळीवर काम करणार्‍या संस्थांना डावलून बाहेरील सल्लागार समितीला नेमल्याचा आरोप शहरातील सामाजिक संस्थानी केली आहे. वेळोवेळी शहरातील जैवविविधतेसाठी महापालिका अधिकार्‍यांशी चर्चा करुनही नदी जैवविविधतेसाठी कोणतेही ठोस पाऊल उचलले गेले नाही. आजही अनेक संस्था महापालिकेचा कोणताही आधार नसताना शहरात काम करत आहेत. त्यामुळे महापालिका जैवविविधतेसाठी खरेच काम करणार की केवळ कागदोपत्री अहवाल तयार करणार, असा सवाल उपस्थित होत आहे.