महापालिकेकडून पर्यावरण अहवाल बनवण्याची प्रक्रिया सुरू

0

नागरिकांकडून मागविली माहिती

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेने पर्यावरण सद्यस्थिती अहवालाचे काम हाती घेतले आहे. शहरातील ज्या सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्थांनी वर्षभरात पर्याववरण विषयक उपक्रम राबविले आहेत, पर्यावरणाच्या दृष्टीने चांगले कार्य केले आहे, त्याची माहिती मागविण्यात आली आहे. ही माहिती पर्यावरण स्थिती अहवालात समाविष्ट करण्यात येणार आहे. शहरातील विविध भागातील हवा, ध्वनी, जल प्रदूषणाची शास्त्रीयदृष्ट्या चाचणी करून नागरिकांना प्रदूषणमुक्त जीवन जगण्यासाठी वातावरण तयार करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. त्यादृष्टीने राज्य शासनाने सर्वच महापालिकांना 31 जुलैपूर्वी पर्यावरण सद्यस्थिती अहवाल सादर करण्याचे बंधन घातले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका गेल्या तीन वर्षांपासून नियमितपणे पर्यावरण अहवाल तयार करत आहे.

महापालिका क्षेत्राचा विकास साधताना पर्यावरणाचे संतुलन ठेवण्यासाठी काही उपाययोजना करणे आवश्यक असते. पालिकेच्या मुलभूत व पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, मलनिस्सारण, घनकचरा, प्राणी व वनसंपदा, विरंगुळ्याची साधने, हवा, पाणी, ध्वनीप्रदूषण आदींचा अभ्यास करून पर्यावरण अहवाल तयार केला जातो. त्यातून लोकजागृती हा एक उद्देश आहे. शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात, याचा उहापोह झाल्यास काही बाबींवर नियंत्रण आणता येते. पर्यावरणातील विविध घटकांचा अभ्यास आणि त्याचे प्रमाणबद्ध मूल्यांकन करून दरवर्षी पर्यावरण सद्यस्थिती अहवाल सादर केला जातो. तो 31 जुलैअखेर प्रसिद्ध करणे बंधनकारक आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाद्वारे दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार पालिकेने 2017-18 च्या पर्यावरण अहवालाचे काम हाती घेतले आहे. त्यासाठी पालिकेच्या सर्व विभागाकडून माहिती मागविण्यात आली आहे.

पर्यावरण अभियांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी म्हणाले की, महापालिकेने पर्यावरण अहवाल बनविण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. शहरातील ज्या सामाजिक, शैक्षणिक संस्था किंवा नागरिकांनी पर्यावरणाबाबत चांगले कार्य केले आहे. झाडांची लागवड केली आहे. प्लॉस्टिक कमी करण्यासाठी वेगळे उपक्रम राबविले आहे. पर्यावरणाचे संतुलन ठेवण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत, अशा नागरिकांकडून माहिती मागविली आहे.