महापालिकेकडून शहरातील मालमत्ताधारकांना दिलासा

फेरमुल्यांकनात आकारण्यात आलेल्या करात केली कपात

 

जळगाव : महापालिकेकडून शहरातील मालमत्तांचे फेरमुल्यांकन करण्यात आले होते. या फेरमुल्यांकनात झालेली आकारणी कमी करुन नागरिकांना दिलासा देण्यात यावा, अशी मागणी नागरिकांसह मनपा पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली होती. त्यानुसार मनपा प्रशासनाने पार्किंग, बेसमेंट, पोट माळा, भाडे करारासाठी केलेल्या आकारणीत कपात केली असून मालमत्ताधारकांना दिलासा दिला आहे.

महापालिकेने अमरावती येथील एका संस्थेच्या माध्यमातून शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण करुन १७ वर्षांनंतर फेरमुल्यांकन केले. मात्र, मनपाने केलेल्या फेरमुल्यांकनामुळे नागरिकांना मोठ्या आर्थिक फटका बसत असल्यामुळे फेरमुल्यांनाच्या आकारणीत कपात करण्यात यावी व इतर महापालिकांनी ज्याप्रमाणे आकारणी केली आहे. त्याप्रमाणे आकारणी करण्यात यावी, अशी मागणी नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाकडे केली होती. त्या अनुषंगाने मनपा प्रशासनाने तीन सदस्यांची एक समिती गठीत करुन इतर महानगरपालिकांमधील फेरमुल्यांकनाचा आभ्यास केला. त्यानंतर मनपा प्रशासनाने पार्किंग, बेसमेंट, पोट माळा, क्लिनिक, सी.ए.ऑफिस, भाडे करारासाठी केलेल्या आकारणीत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

अशी झाली कपात

फेरमुल्यांकनात पार्किंगसाठी ५० टक्के आकारणी करण्यात आली होती आता त्यात ४० टक्के कपात करण्यात येवून फक्त १० टक्के आकारणी करण्यात आली आहे. तसेच बेसमेंटला (तळ मजला)१०० टक्केपैकी ५० टक्के कपात करण्यात आली आहे. तसेच निवासाच्या मालमत्तेतील क्लिनिक व सीए ऑफिसला दुप्पट आकारणी होती आता दीड पट असणार आहे.भाडे करार नसलेल्या मालमतांना मालमत्ताकरावर ४० टक्के आकारणी करण्यात येणार आहे.