महापालिकेकडून सत्कारावेळी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ बंद!

0

रोपटे, पुस्तक देऊन होणार सन्मान

पिंपरी-चिंचवड : महापालिकेच्या वतीने विविध मान्यवरांच्या सत्कारासाठी बुके, फुले, शाल, श्रीफळाचा वापर केला जातो. परंतु, यावर मोठ्या प्रमाणात खर्च होत आहे. त्यामुळे यापुढे पालिकेकडून बुके, फुले, शाल, श्रीफळ देऊन नव्हे तर रोपटे किंवा पुस्तक देऊन सन्मान करण्यात येणार आहे. याबाबतचा ठराव बुधवारी झालेल्या स्थायी समितीत करण्यात आला. तसेच पालिकेची दैनदिनी (डायरी) देखील छोटी (पॉकेट) छापण्यात यावी, असा देखील निर्णय घेण्यात आला. अनावश्यक खर्च कमी करण्यासाठी हे निर्णय घेतल्याचे, समितीचे सदस्य विलास मडिगेरी यांनी सांगितले.

गेल्यावर्षी बुकेवर 25 लाख खर्च
सभेच्या अध्यक्षस्थानी ममता गायकवाड होत्या. त्यानंतर पत्रकार परिषदेत माहिती देताना मडिगेरी म्हणाले, महापालिकेच्या वतीने विविध मान्यवरांचे सत्कार केले जातात. सेवानिवृत्त कर्मचारी, विविध समित्यांचे सदस्य, पदाधिकारी नियुक्ती सत्कार, खेळाडूंचा सत्कार, पालिकेत येणार्‍या अतिथींच्या सत्कारासाठी बुके, फुले, शाल, श्रीफळाचा वापर केला जातो. परंतु, सत्कार केलेल्या बुकेंचा काही फायदा होत नाही. दोन दिवसात त्याचे कचर्‍यात रुपांतर होते. तसेच त्यावर मोठ्या प्रमाणात खर्च देखील होत आहे. गतवर्षात केवळ बुकेवर 25 लाख रुपयांचा खर्च झाला आहे. त्यामुळे यापुढे महापालिकेकडून केल्या जाणार्‍या विविध सत्कार समारंभात बुके, फुले, शाल, श्रीफळाचा वापर करण्यात येणार नाही. त्याऐवजी महापालिकेच्या नर्सरीत तयार झालेले रोपटे किंवा उपयोगी पुस्तक देऊन सन्मान करण्यात येणार आहे

खर्चात वाचण्यासाठी निर्णय
महापालिकेतर्फे लोकप्रतिनिधी, अधिकारी, विविध दैनिकांचे वार्ताहर, शहराची माहिती असणारी डायरी छापण्यात येते. एक डायरी 103 रुपयाला छापली जाते. त्यानुसार आठ हजार डाय-या छापण्यासाठी दहा लाख रुपये खर्च येतो. त्यामुळे यापुढे मोठ्या आकाराची डायरी छापण्यात येऊ नये. त्याऐवजी छोटी (पॉकेट) डायरी छापण्यात यावी, असा ठराव केला असल्याचेही मडिगेरी यांनी सांगितले. अनावश्यक खर्च कमी करण्यासाठी हे निर्णय घेतल्याचेही त्यांनी सांगितले.