आयुक्त सौरभ राव करणार सादर
पुणे : महापालिकेच्या आर्थिक वर्ष 2019-20साठीचा अर्थसंकल्पीय आराखडा आयुक्त सौरभ राव 17 जानेवारीला सादर करणार आहेत. सुमारे पंधराशे ते दोन हजार कोटी रुपयांच्या महसुली तुटीच्या पार्श्वभूमीवर आयुक्त प्रथमच अर्थसंकल्पीय आराखडा सादर करणार आहेत. त्यामुळे या आराखड्यातून आयुक्त पुणेकरांच्या पदरात नेमक्या कोणत्या योजनांचे दान टाकणार, उत्पन्नवाढीसाठीच्या उपाययोजना आणि मोठ्या प्रकल्पांसाठीच्या खर्चाचा मेळ कसा घालणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तारीख दोन दिवस पुढे ढकलली
पालिका आयुक्त दरवर्षी 15 जानेवारीपूर्वी प्रशासनाचा अर्थसंकल्पीय आराखडा स्थायी समितीला सादर करतात. त्यानंतर स्थायी समितीमार्फत पालिकेचा अंतिम अर्थसंकल्प मांडला जातो. मात्र, यंदा आयुक्तांनी अर्थसंकल्पीय आराखडा सादर करण्याची तारीख दोन दिवस पुढे ढकलली आहे. त्याबाबतचे पत्र आयुक्तांनी स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक यांना दिले आहे. 15 जानेवारीला मकरसंक्रांत असल्याने यंदा अर्थसंकल्पीय आराखडा 17 जानेवारीला सादर होणार आहे. तत्कालीन आयुक्त कुणाल कुमार यांनी सादर केलेला चालू आर्थिक वर्षाचा सुमारे 5 हजार 397 कोटी रुपयांचा अर्थसंकल्पीय आराखडा पाचशे कोटींनी रोडावला होता. पालिकेच्या घटलेल्या उत्पन्नामुळे नव्या योजनांना फाटा देऊन तत्कालीन आयुक्त कुणाल कुमार यांनी चालू योजना पूर्ण करण्यावर भर दिला होता. यंदाही महसूलात मोठी तूट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यमान आयुक्तही आपल्या आराखड्यात जुन्याच योजना पूर्ण करण्यावर भर देणार की नव्या योजनांना प्राधान्य देणार याची उत्सुकता आहे.