पिंपरी-चिंचवड : महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभाग व अग्निशामक विभागाच्या वतीने पूर नियंत्रण आराखडा- 2017 तयार करण्यात आला आहे. अतिवृष्टी झाल्यास किंवा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केल्यास नदीकाठच्या भागांमध्ये पूर परिस्थिती निर्माण होते. ही स्थिती हाताळण्यासाठी महापालिकेने मुख्य प्रशासकीय इमारतीत पूर नियंत्रण आपत्ती निवारण कक्ष सुरू केला असून, प्रभाग कार्यालयांतही यंत्रणा सज्ज आहे.
अग्निशामक विभागही सज्ज
पवना व मुळशी धरण भरल्यानंतर विसर्ग केला जातो. यामुळे नदीकाठच्या वस्त्यांत पाणी शिरते. अशा वेळी पूरनियंत्रण आपत्ती निवारण कक्ष प्रभाग कार्यालयांना मदतीबाबत सूचना करते. सहा क्षेत्रिय कार्यालयात पूर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. क्षेत्रिय अधिकारी कक्षप्रमुख आहेत. येथे तीन पाळ्यांमध्ये कर्मचारी नियुक्त आहेत. पूरग्रस्तांना सूचित करण्यासाठी मेगाफोन व रिक्षांवर ध्वनिक्षेपकही सज्ज ठेवले आहेत. पूर परिस्थिती हाताळण्यासाठी अग्निशामक विभागही सज्ज असून, त्यांनी रबर बोट, मोठी दोरी, जवानांची पथके तयार ठेवली आहेत. आपत्ती व्यवस्थापन अधिकारी पवना व मुळशी धरण येथील पाटबंधारे विभागाच्या संपर्कात राहतील.
महापालिकेतर्फे सहकार्याचे आवाहन
पूर परस्थिती निर्माण झाल्यास तातडीने दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, अफवांवर विश्वास ठेऊ नये, पवना धरण पूर्ण क्षमतेने भरत आलेले असल्याने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. संभाव्य बाधित क्षेत्रातील रहिवाशांनी सतर्क रहावे. स्वत:हून पर्यायी ठिकाणी अथवा संक्रमण शिबिरामध्ये स्थलांतरित होऊन जीवित व वित्तहानी टाळण्यास प्रशासनास मदत करावी, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.
हेल्पलाईन क्रमांक
मध्यवर्ती पूर नियंत्रण कक्ष (020 – 67331556), ‘अ’ क्षेत्रिय कार्यालय (020 – 27656621, 9922501453), ’ब’ क्षेत्रिय कार्यालय (020 – 27350153, 9922501455), ’क’ क्षेत्रिय कार्यालय (020 – 27122969, 9922501457), ’ड’ क्षेत्रिय कार्यालय (020 – 27277898, 9922501459), ‘ई’ क्षेत्रिय कार्यालय (020 – 27230410, 86057222777), ’फ’ क्षेत्रिय कार्यालय (020 – 27650324, 8605422888).