महापालिकेची अवैध नळजोड धारकांवरील कारवाई अधिक तीव्र

0
आतापर्यंत शहरातील 390 अवैध नळजोड तोडले
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेने अवैध नळजोड धारकांवरील कारवाई अधिक तीव्र केली आहे. पाणीपुरवठा विभागाने आजपर्यंत 389 अवैध नळजोड तोडले असून त्यांचा पाणीपुरवठा बंद केला आहे. ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील सर्वाधिक म्हणजेच 78 अवैध नळजोड तोडले आहेत. तर, सर्वात कमी ‘अ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील 30 अवैध नळजोड तोडण्यात आले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील पाणीपुरवठा गेल्या काही दिवसांपासून विस्कळीत होत आहे. शहरात अनधिकृत नळजोडचे प्रमाण जास्त आहे. चुकीच्या पद्धतीने नळ जोड केले आहेत. त्यामुळे 30 ते 40 टक्के पाण्याची गळती होत असल्याचा प्रशासनाचा दावा आहे. तसेच दुषित पाणीपुरवठा देखील होतो. त्यासाठी महापालिकेने मे महिन्यापासून अनिधकृत नळजोडचे सर्वेक्षण केले.
कारवाई केली तीव्र 
अनधिकृत नळजोडच्या सर्वेक्षणात शहरात केवळ 16 हजार अवैध नळजोड सापडले. यापैकी नियमित करण्यासाठी पाच हजार 14 जणांनी अर्ज केले होते. पाणी पुरवठा विभागाने दोन हजार 964 अर्ज मंजूर केले. तथापि, शहरातील अनधिकृत नळजोडची 16 हजार ही संख्या अतिशय नगण्य असून यापेक्षा शहरात अधिक अवैध नळजोड आहेत. त्यामुळे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने अवैध नळजोड धारकांवर धडक कारवाई सुरु केली आहे. आजपर्यंत 389 नळजोड तोडले असून त्यांचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. यापुढे देखील ही कारवाई तीव्र केली जाणार आहे.
नागरिकांचा अल्प प्रतिसाद
अनधिकृत नळजोड धारकांनी नियमित करण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन केले होते. तथापि, नागरिकांचा त्याला अल्प प्रतिसाद मिळाला. ‘अ’ क्षेत्रीय कार्यालय परिसरातील 30 अवैध नळजोड तोडले आहेत. तर, ‘ब’ क्षेत्रीय कार्यालय परिसरातील 41, ‘क’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील 44, ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील 69, ‘इ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील 40, ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील 50, ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील 37 आणि ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील 78 असे एकूण 389 अवैध नळजोड तोडण्यात आले आहेत. त्यांचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे.