महापालिकेची धूर फवारणी पद्धत बंद करावी

0
पाहणीनंतर इसिए सदस्यांनी केली मागणी
पिंपरी : शहरामध्ये अशी अनेक ठिकाणे आहेत की, जेथे डासांची निर्मिती मोठ्या प्रमाणात रोज होत आहे. त्यांच्या नियंत्रणासाठी महापालिका स्थानिक नगरसेवकांच्या सूचनेनुसार परिसरात धूर फवारणी करीत असते. मात्र एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन असोसिएशनने केलेल्या पाहणीनुसार अनेक गोष्टी उघड झाल्या आहेत. त्यापैकी एक म्हणजे ही धूर फवारणी होय. धूर फवारणी करताना नजरेस आलेल्या गोष्टी इसिए टीम सदस्यांनी महापालिका वैद्यकीय संचालक डॉ.पवन साळवी यांच्याशी चर्चा केली. धूर फवारणी ऐवजी कीटक नाशकांची औषध फवारणी करावी, असा उपाय यावेळी महापालिका अधिकार्‍यांना सूचविण्यात आले.
यावेळी इसिए संचालक विकास पाटील यांनी सांगितले की, धूर फवारणीमुळे अस्थमा होण्याची दात शक्यता असते. डीझेलमध्ये काही जंतुनाशके वापरली जातात. त्यामुळे वाहनापेक्षा हा धूर जास्त घातक आहे. जास्त करून धूर फवारणी सायंकाळी होत असल्याने यावेळेला मुले घरात असतात. रस्त्यावर असणार्‍यांचा अपघाताचा संभव आहे. या धूरामुळे बाहेरील डास घरात शिरतात. वाहतुकीची कोंडी होते व नागरिक सैरावैरा पळतात. यामुळे डास निर्मिति कदापी थांबत नाही अथवा नियंत्रणात येत नाही. त्यामुळे इसिएच्या अभ्यासगटाने महापालिकेस असे सुचविले आहे की, ज्या परिसरात डासांची निर्मिती जास्त प्रमाणात होत आहे, त्या परिसरातील डासनिर्मिती ठिकाणावर कीटक नाशकांची औषध फवारणी सकाळी 8 ते 12 या वेळेत करावी. त्यावेळी डास आपल्या जागेवर बसलेले असतात ती त्यांची विश्रांतीची वेळ असते. महापालिकेच्या पैशांची उधळण थांबविण्यासाठी ही धूर फवारणी त्वरित थांबणे गरजेचे आहे. जंतूनाशके फवारणी कर्मचारी हे संपूर्ण प्रशिक्षित असणे गरजेचे आहे. स्वतःच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी सर्व सुरक्षा साधने उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.