महापालिकेची पार्किंग ‘पॉलिसी’ तयार

0

अनधिकृत पार्किंगला बसणार लगाम

पिंपरी-चिंचवड : शहरात पार्किंगची मोठी समस्या आहे. पार्किंग समस्येवर तोडगा काढण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. पालिकेने पार्किंग पॉलिसी तयार केली आहे. लवकरच महासभेची मान्यता घेऊन त्याची अमंलबजावणी केली जाईल, अशी माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली. अनधिकृत पार्किंगला लगाम लावणार असल्याचेही, त्यांनी सांगितले. वाहनांची वाढती संख्या, वाहतूक नियमांचे पालन न करण्याची वाढती प्रवृत्ती आणि शहराचा वाढता परिसर बघता पार्किंग झोन नाही, त्याचप्रमाणे महापालिका, वाहतूक पोलीस, प्रशासन करीत असलेल्या दुर्लक्षामुळे शहरातील विविध भागात पार्किंगची समस्या वाढतच आहे. अस्ताव्यस्त पार्किंगमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.

248 झोन तयार
याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, शहरात पार्किंगची समस्या आहे. रस्त्यांवरील पार्किंगची समस्या मोठी आहे. पार्किंग समस्येवर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. ही प्रक्रिया संथ असून त्याला विलंब लागत आहे. पार्किंग, नो पार्किंग झोन निश्‍चित केले जाणार आहेत. केंद्र सरकारच्या फेरीवाला धोरणानुसार हॉकर्स झोन निश्‍चित केले आहेत. 248 झोन आहेत. याबाबत फेरीवाला महासंघाशी चर्चा करण्यात येईल. त्यानंतर नोंदणीकृत हॉकर्सना जागा निश्‍चित करुन दिली जाईल. अनधिकृत फेरीवाल्यांवर, अनधिकृत बांधकामवर पालिकेची कारवाई सुरु आहे. शहरात लावलेले अनधिकृत फलक देखील काढले जात आहेत. त्याची कारवाई वेगात सुरु आहे. अनधिकृत फलक धारकांवार फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत, असेही त्यांनी सांगितले.