महापालिकेची स्थायी सभा चालली केवळ दहा मिनीटे

0

जळगाव। महापालिकेची स्थायी सभा केवळ दहा मिनीटांत आटोपती घेण्यात आली. ही सभा प्रशासकीय इमारतीच्या दुसर्‍या मजल्यावरील सभागृहात सभापती वर्षा खडके यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. याप्रसंगी उपायुक्त लक्ष्मीकांत कहार, शहर अभियंता डी.एस. थोरात, नगरसचिव निरंजन सैंदाणे उपस्थित होते. विषय पत्रिकेवरील विषय संपल्यावर चर्चेसाठी भाजपाच्या उज्वला बेंडाळे ह्या उभ्या राहिल्या असता त्यांना सभापती वर्षा खडके यांनी सभा संपली असून स्थायीत प्रश्‍न उत्तराचा तास नसल्याचे सूचित करीत सभा गुंडाळली.

विद्यार्थी संख्या कमी असल्याने बालवाडी बंद
स्थायी सभेत विषय पत्रेकवरील सर्व 5 विषय मंजूर करण्यात आले. मनपा बालवाडी शिक्षिका व मदतनीस यांना उन्हाळी सुटीनंतर नवीन नियुक्ती देण्याचा प्रस्ताव प्रशासनातर्फे मांडण्यात आला होता. मनपाच्या बालवाडीबाबत भाजपाच्या नगरसेविका उज्वला बेंडाळे यांनी विचारणा केली. यात बेंडाळे यांनी म्युनसिपल कॉलनी येथील बालवाडी बंद असल्याची तक्रार केली. याला उत्तर देतांना महिला व बालकल्याण अधिक्षक जगन्नाथ खडके यांनी गेल्या दोन वर्षांपासून पुरेशी विद्यार्थी संख्या नसल्याने म्युनसिपल कॉलनीतील बालवाडी बंद असल्याचा खुलासा केला. तसेच येत्या शैक्षणिक वर्षाकरीता सर्व्हेक्षण करून पुरेशी विद्यार्थी संख्या मिळाल्यास बालवाडी सुरू करण्यात येईल अशी माहिती सभागृहाला दिली.

कागदपत्रे तपासून निर्णय घ्या…
आरोग्य निरीक्षक शशिकांत कुरकुरे यांचा सेवा निवृत्तीचा अर्ज आयत्या वेळेचा विषय म्हणून सादर करण्यात आला. यात कुरकरे यांनी त्यांची मानसिक, शारिरीक स्थिती चांगली नसल्याने त्यांनी स्वेच्छा निवृत्तीचाअर्ज प्रशासनाकडे दिला असल्याचे नमुद केले आहे. ते विविध आजारांनी पिडीत असून त्यांना वाढत्या कामाचा ताण सहन होत नाही. मात्र, प्रशासन त्यांचा अर्ज स्विकारत नसल्याने सभागृहात स्वेच्छा निवृत्तीचा अर्ज सादर केला असल्याचे त्यांनी नमुद केले आहे. यावर सभापती वर्षा खडके यांनी कुरकुरे यांचे कागदपत्रे तपासून निर्णय घेण्यात यावा असे आदेश दिले आहेत.