पुणे । महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांना गणवेश आणि शालेय साहित्यासाठी ज्याप्रमाणे डीबीटी कार्ड देण्याचा उपक्रम महापालिकेने राबवला. त्याप्रमाणेच आता कर्मचार्यांनाही त्यांचे साहित्य महापालिका पुरवण्यापेक्षा त्याचे त्यांना थेट पैसेच दिले जाणार आहेत. कर्मचार्यांनी ठरवून दिलेल्या वस्तू त्यांच्या आवडीप्रमाणे घ्यायच्या असून, त्याची महापालिकेने ठरवून दिलेली एक रक्कम कर्मचार्याच्या खात्यात जमा होणार आहे.
विद्यार्थ्यांच्या गणवेश वाटपात पारदर्शीपणा रहावा यासाठी डीबीटी कार्डची सोय करण्यात आली. त्याप्रमाणेच दरवर्षी महापालिकेतील विविध श्रेणीतील अधिकारी आणि कर्मचार्यांना सुमारे 432 विविध प्रकारचे साहित्य महापालिकेतर्फे दिले जाते. महापालिकेच्या भांडार विभागाकडून निविदा प्रक्रियेद्वारे हे साहित्य मागवण्यात येते. यामध्ये शिपाई, अन्य कर्मचारी यांच्या गणवेशापासून ते चर्तुर्थश्रेणी कर्मचारी, सफाई कर्मचारी यांचा गणवेश, गंबूट, हॅण्डग्लोव्हज, हात धुण्यासाठीचे लिक्वीड, साबण अशा सुमारे 432 साहित्यांची यादी महापालिका प्रशासनाने काढली आहे. या गोष्टींना किती रक्कम लागते याची माहिती महापालिका प्रशासनाने काढली असून, त्या त्या कर्मचार्यांच्या खात्यात ती रक्कम जमा केली जाणार आहे. त्या पैशातून त्यांनी या साहित्याची, गणवेशाची खरेदी करणे अपेक्षित असून, यामुळे त्यांना आता भांडार विभागातून अमुक अमुक गोष्ट मिळाली नाही किंवा काय तसेच भांडार विभागावर होणारे भ्रष्टाचाराचे आरोप याविषयीची तक्रार करता येणार नाही. याशिवाय थेट अकाउंटमध्येच पैसे जमा झाल्याने, संबंधित कर्मचार्याला त्याला हवी तशी वस्तू घेता येणार आहे.
संबंधित कर्मचार्याला जर दिलेल्या पैशांपेक्षा जास्त किंमतीची वस्तू आवडल्यास त्याने स्वत:च्या खिशातून जादाची रक्कम घालून ती ते खरेदी करू शकतात. त्यामुळे त्याला तो चॉईस’ राहणार आहे. मात्र त्याने महापालिकेच्या लिस्टमधील अत्यावश्यक वस्तू खरेदी केली आहे किंवा नाही, याची तपासणी कडकपणे केली जाणार आहे. या उपक्रमासाठी कर्मचार्यांची लिस्ट करण्याचे काम सुरू असून, सप्टेंबरपासून याची अंमलबजावणी होणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त शीतल उगले यांनी दिली