महापालिकेच्यावतीने आयोजित केलेल्या जत्रेला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद 

0
तीन दिवसात पवनाथडी जत्रेत 70 लाखाची उलाढाल
महिला बचतगटातर्फे उत्पादीत वस्तूंचे प्रदर्शन व विक्री
सांगवी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्यावतीने आयोजित केलेल्या पवनाथडी जत्रेला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला असून गेल्या तीन दिवसात पवनाथडी जत्रेमध्ये सुमारे सत्तर लाख रुपयांची आर्थिक उलाढाल झाली. जत्रेचा आजचा शेवटचा दिवस आहे. महापालिकेतील नागरवस्ती विकास योजना विभागाच्यावतीने महिला बचत गटांच्या उत्पादनाला बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी 4 जानेवारी ते 8 जानेवारी 2019 या कालावधीमध्ये सांगवीतील पी डल्ब्यू डी मैदानावर पवनाथडी जत्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्यामध्ये महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्रीचे आयोजन केले आहे.
813 बचत गटांचे स्टॉल्स
सुमारे 813 बचत गटांनी आपले स्टॉल्स उभारले असून त्यामध्ये शाकाहारीचे पदार्थांचे 247  व मांसाहारी पदार्थांचे 205 तर इतर 361 स्टॉल्सचा समावेश आहे. 4 जानेवारी रोजी शाकाहारी पदार्थांची एक लाख एकतीस हजार आठशे रुपयांची तर मांसाहारी पदार्थांची दोन लाख 40 हजार 500 रुपयांची आणि इतर एक लाख  78 हजार 466 रुपयांची उलाढाल झाली. 5 जानेवारी रोजी शाकाहारी पदार्थांची अकरा लाख 76  हजार 342 रुपयांची तर मांसाहारी पदार्थांची चौदा लाख 500 रुपयांची आणि इतर नऊ लाख 36 हजार 200 रुपयांची उलाढाल झाली.
विविध कलाकारांची कला सादर
6 जानेवारी रोजी शाकाहारी पदार्थांची पाच लाख 15 हजार 100 रुपयांची तर मांसाहारी पदार्थांची बावीस लाख 700 रुपयांची आणि इतर दोन लाख 42 हजार 400 रुपयांची उलाढाल झाली. पवनाथडी जत्रेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्यामध्ये विविध कलाकारांनी व बालचमूंनी आपली कला सादर करून उपस्थितांची मने जिंकली. लावण्य दरबार या कार्यक्रमात महिला कलाकारांनी आपली लोककला सादर केली. हिंदी जुनी गीते, कव्वाली व गजल असा त्रिवेणी संगीताच्या कार्यक्रमास प्रचंड गर्दी झाली होती. पवनाथडी जत्रेस महापौर राहुल जाधव, आमदार लक्ष्मण जगताप,  स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, तसेच आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी भेट देवून स्टॉल्सची पाहणी केली.