पिंपरी-चिंचवड : रावेत परिसरात असलेल्या अनधिकृत बांधकामांवर बुधवारी महापालिका प्रशासनाच्या वतीने कारवाई करण्यात आली. रावेत, सर्व्हे क्रमांक 203 मध्ये कारवाई सुरू असताना जेसीबीद्वारे पाडलेली गोठ्याच्या पत्राशेडची भिंत एका 60 वर्षीय वृद्धाच्या अंगावर पडली. या घटनेत त्या वृद्धाच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली. प्रकाश नामदेव जाधव (वय 60, रा. रावेत, सर्व्हे क्रमांक 203) असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त करत महापालिकेच्या अधिकार्यांचा चांगलेच धारेवर धरले. रावेत परिसरात अनेक अनधिकृत बांधकामे सुरू असताना महापालिकेचे अधिकारी केवळ काही ठराविक बांधकामांवरच कारवाई करत आहे, असा आरोप नागरिकांनी केला. यामुळे येथे काही काळ तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर जखमी प्रकाश जाधव यांना महापालिकेच्या वाहनातून पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले.
गोठ्याची भिंत पडली अंगावर
मिळालेल्या माहितीनुसार, महापालिकेच्या अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागातर्फे बुधवारी रावेतमध्ये कारवाई सुरू होती. प्रकाश जाधव यांच्या गोठ्याच्या पत्राशेडचे नवे बांधकामदेखील अनधिकृत होते. हे बांधकाम पाडण्यासाठी जेसीबी येताच जाधव व त्यांच्या पत्नीने कारवाईला विरोध केला. मात्र, पथकातील अधिकार्यांनी विरोध झुगारून कारवाई सुरूच ठेवली. याच दरम्यान, जेसीबीने गोठ्याची भिंत पाडली. ही भिंत सरळ प्रकाश जाधव यांच्या अंगावर कोसळली. त्यांच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली. या प्रकाराने तेथील नागरिक संतप्त झाले. नंतर जाधव यांना महापालिकेच्या वाहनाद्वारे वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांच्या पायाची नस दाबली गेल्यामुळे रक्तपुरवठा व्यवस्थित होत नव्हता. त्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर वायसीएममध्ये नसल्याने त्यांना पुण्याच्या ससून रुग्णालयात हलवण्यात आले.
आम्ही पळ काढला नाही
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस तसेच महापालिका अधिकार्यांनी जखमी प्रकाश जाधव यांना मदत न करता तेथून सरळ पळ काढला. मात्र, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली; ते पिंपरी-चिंचवड महापालिकेचे उपअभियंता केशवराज फुटाणे म्हणाले की, कारवाई नियमाप्रमाणे चालू होती. कारवाईला नागरिकांनी प्रचंड विरोध केला. त्यामुळे तेथे तणाव निर्माण झाला होता. गोठ्याची एका बाजूची चार फूट उंचीची भिंत पाडत असताना प्रकाश जाधव अचानक समोर आले. त्याच वेळी भिंत जेसीबीने पाडल्याने ते जखमी झाले. त्यावेळी आम्ही तेथून पळ काढला नाही. उलट जाधव यांना तातडीने महापालिकेच्याच वाहनातून वायसीएम रुग्णालयात दाखल केले, असे केशवराज फुटाणे यांनी सांगितले.
कारवाईचा केवळ दिखावा
रावेत परिसरात अनेक अनधिकृत बांधकामे चालू असताना केवळ मोजक्याच बांधकामावर कारवाई केली जात आहे. महापालिकेचे अधिकारी इतर बांधकामांना पाठिशी घालत असून, त्यामागे अर्थकारण दडले आहे, असा आरोप येथील काही नागरिकांनी केला. अनधिकृत बांधकामांबाबत दररोज एक-दोन तक्रारी दाखल होत असताना कारवाईचा केवळ फार्स सुरू आहे. एखाद्या तक्रारीबाबत तत्काळ कारवाई तर एखाद्या तक्रारीबाबत नियमावर बोट ठेऊन चालढकल सुरू आहे. महापालिकेच्या बांधकाम खात्यातील अंदाधुंद कारभारावर वचक कोण ठेवणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
बांधकाम परवानगी कळीचा मुद्दा
शहरात कोणतेही बांधकाम करताना महापालिकेकडून परवानगी घ्यावी लागते. मात्र, बांधकाम परवान्यासाठी असणार्या किचकट अटी व परवानगी देण्यासाठी होणारी दिरंगाई यामुळे अनेक जण परवानगी न घेताच बांधकाम सुरू करतात. काही ठराविक प्रकरणात बांधकाम परवानगीची चौकशी होते. मात्र, ही चौकशी अनेकदा व्यक्ती, पक्ष, गट पाहूनच होते. काही प्रकरणांत राजकीय हस्तक्षेपही होतो. मुळात बांधकाम परवानगी हाच कळीचा मुद्दा आहे, असाही सूर यानिमित्ताने उमटला.
आकसापोटी कारवाई नको
रावेत परिसरात अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामे चालू असताना केवळ आकसापोटी महापालिकेचे अधिकारी काही बांधकामांवर कारवाई करतात. इतर बांधकामांना पाठिशी घातले जाते. कारवाई करायची तर सरसकट सर्वच अनधिकृत बांधकामांवर करावी. यामुळे सर्वसामान्यांच्या मनात महापालिका प्रशासनाबद्दल असणारी आत्मियता कमी होत आहे, असे मत चिंचवड विधानसभेचे युवासेना अधिकारी दीपक भोंडवे यांनी व्यक्त केले.