आमदार आशिष शेलार यांचा विधानसभेत सनसनाटी आरोप
मुंबई :- महापालिकेत काम करणारे अधिकारी यांचे अंडरवर्ल्ड आणि दाऊद इब्राहिम याच्याशी लागेबांधे असल्याचा आरोप मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी मंगळवारी विधानसभेत केला. मुंबईमध्ये बेकायदेशीर इमारती उभारल्या जात आहेत. महापालिकेचे अधिकारी हे या इमारतीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचेही शेलार यावेळी म्हणाले.
१० मजली बेकायदेशीर इमारती बांधल्या जात असताना त्या विभागातील अधिकारी काय करतात हा संशोधनाचा विषय आहे. बेकायदेशीर बांधकामाच्या विरोधात कोणी तक्रार केली, तर तक्रार देणाऱ्या व्यक्तीला अंडरवर्ल्डकडून धमक्या दिल्या जात असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. भाजपचे आमदार राज पुरोहित यांना देखील धमक्या दिल्या जात असल्याचे आमदार आशिष शेलार विधानसभेत म्हणाले.
मुंबईत बेकायदेशीर इमारत उभी राहत असताना महापालिकेचे अधिकारी काहीही करत नाही. त्यानंतर संबंधित बिल्डरला न्यायालयात जाण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व संधी पालिकेचे अधिकारी उपलब्ध करुन देतात. या शिवाय अंडरवर्ल्डशी संधान ठेऊन पालिकेचे अधिकारी कामकाज करत असल्याचा आरोप आशिष शेलार आणि अतुल भातखळकर यांनी विधानसभेत केला.