पुणे : महापालिकेकडील कंत्राटी कर्मचार्यांना वेतनचिठ्ठी देणे बंधनकारक असतानाही अनेक ठेकेदारांकडून त्याची अंमलबजावणी केली जात नसल्याचे समोर आले आहे. यासंबंधीची जबाबदारी खातेप्रमुखांवर असूनही त्यांच्याकडून कानाडोळा होत असल्याने कंत्राटी कर्मचार्यांची लूट होत आहे.
महापालिकेच्या घनकचरा, मलनिस्सारण, ड्रेनेज, पाणीपुरवठा, भवन, अतिक्रमण, सुरक्षा तसेच क्षेत्रीय कार्यालयांच्या कामासाठी कंत्राटी पद्धतीने कर्मचारी कामावर घेतले जातात. या कर्मचार्यांना किमान वेतन कायद्यानुसार महापालिकेकडून ठेकेदारांमार्फत वेतन दिले जाते. मात्र, अनेकदा ठेकेदार कर्मचार्यांना नियमानुसार जेवढे वेतन दिले जाणे आवश्यक आहे ते न देता त्यांची फसवणूक करतात. अनेक ठेकेदारांनी तर कर्मचार्यांचे भविष्य निर्वाह निधीचे पैसेही भरले नसल्याचे प्रकार समोर आले आहे.