महापौर राहुल जाधव यांनी केले आवाहन
चिंचवड : भविष्यकाळात देखील पिंपरी-चिंचवडकरांसाठी महापालिका विविध कल्याणकारी योजना राबविणार आहे. ज्या-ज्या योजना महापालिकेच्यावतीने राबविण्यात येत आहेत. त्या सर्व योजनांची पारदर्शकपणे अंमलबजावणी करण्यात येईल. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती विभागामार्फत महिलांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. यामधून महिलांना स्वावलंबी बनविण्याचे मोठे काम पार पाडले जात आहे. तरी या योजनांचा शहरातील महिलांनी जास्तीत-जास्त लाभ घ्यावा असे आवाहन महापौर राहुल जाधव यांनी केले. महापालिकेच्या नागरवस्ती विभागामार्फत शुक्रवारी येथील प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात अटलबिहारी वाजपेयी योजनेअंतर्गत महिलांना शिलाई मशीनकरिता अर्थसहाय्याचे वितरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
यांची होती उपस्थिती
हे देखील वाचा
यावेळी सभागृह नेते एकनाथ पवार, महिला व बालकल्याण समिती सभापती स्वीनल म्हेत्रे, शहर सुधारणा समिती सभापती सीमा चौगुले, जैव विविधता व्यवस्थापन समिती अध्यक्षा उषा मुंढे, ‘ब’ प्रभाग अध्यक्षा करूणा चिंचवडे, ‘क’ प्रभाग अध्यक्षा नम्रता लोंढे, नगरसदस्या स्वाती काटे, अश्विनी चिंचवडे, आशा धायगुडे-शेंडगे, माधवी राजापुरे, उषा ढोरे, अर्चना बारणे, आरती चौंधे, निर्मला कुटे, योगिता नागरगोजे, नगरसदस्य शितल शिंदे, स्वीकृत सदस्य बिभिषण चौधरी, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, सहाय्यक आयुक्त स्मिता झगडे, समाजविकास अधिकारी संभाजी ऐवले उपस्थित होते.
व्यवसाय करण्याची चांगली संधी
एकनाथ पवार म्हणाले की, पिंपरी-चिंचवड महापालिका महिलांसाठी शिलाई मशीनच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देत आहे. आज प्लास्टिकच्या बॅगा बंद आहेत. महिलांना कापडी पिशव्या शिवून व्यवसाय करण्याची चांगली संधी आहे. पुढच्या वर्षी जर शंभर महिला बचत गटांचा व्यवसाय सुरू झाला. तर, अधिक आनंद होईल.पिंपरी-चिंचवड महापालिकेच्यावतीने ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ योजने अंतर्गत एका मुलीवर कुटुंब नियोजनद्वारे शस्त्रक्रीया करणार्या महिलांना 25 हजार रुपये, दोन मुलींवर कुटुंब नियोजनद्वारे शस्त्रक्रीया करणार्या महिलांना दहा हजार देण्यात येत आहेत. त्याअंतर्गत 42 लाभार्थी महिलांचा सन्मानही यावेळी करण्यात आला. अशोक देशमुख यांनी महिलांसाठी ‘ताण तणावा पासून मुक्ती’ हा मनोरंजनात्मक कार्यक्रम सादर केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त स्मिता झगडे यांनी केले. तर,सूत्रसंचालन भाऊसाहेब कोकाटे यांनी केले.