महापालिकेच्या ठेकेदारांची पीएफ विभागाकडून चौकशी

0

पिंपरी-चिंचवड : ठेकेदारांनी कर्मचार्‍यांच्या भविष्यनिर्वाह निधीची रक्कम भरली आहे की नाही, याची चौकशी सुरू केली असून, त्यासंदर्भातील माहिती सादर करण्याचे आदेश महापालिकेला देण्यात आले आहे. महापालिकेला जानेवारी 2011 ते डिसेंबर 2013 या तीन वर्षांच्या कालावधीत विविध विभागांतील कामे कोणत्या ठेकेदारांना दिली होती, त्यांनी संबंधित कर्मचार्‍यांच्या पीएफची रक्कम भरली आहे का, याची तपशीलवार माहिती भविष्यनिर्वाह निधी कार्यालयाने मागवली आहे. यासंदर्भात सुनावणी सुरू असून, ही माहिती सादर करण्याचे आदेश महापालिकेला देण्यात आले आहेत. पालिका प्रशासनाने ही माहिती सादर करण्यात वेळकाढूपणा केला, तर भविष्यनिर्वाह निधी कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाई होऊ शकते, असे या विभागातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

महापालिकेवर कारवाई होवू शकते
दरम्यान, आयुक्तांनी या कालावधीत कामे केलेल्या ठेकेदारांनी दिलेल्या वेतनाची (लेबर कॉस्ट) माहिती 31 जानेवारी 2018 पर्यंत लेखा विभागाकडे पाठवण्याची सूचना शहर अभियंता, सहशहर अभियंता, विकास अभियंता, मुख्य उद्यान अधीक्षक, मुख्य माहिती तंत्रज्ञान अधिकारी, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, शिक्षणाधिकारी, प्रशासन अधिकारी, मुख्य आरोग्य अधिकारी, क्षेत्रीय अधिकारी यांना केली होता. मात्र, ती देण्यात न आल्याने दोन दिवसांपूर्वी झालेल्या सुनावणीदरम्यान महापालिकेकडून ती सादर करण्यात आली नाही, असे या सूत्रांनी स्पष्ट केले.