महापालिकेच्या दीड वर्षात 2 हजार कोटींच्या ठेवी

0

नेरुळ । पिंपरी चिंचवड आणि ठाणे या अ आणि ब वर्गांच्या या महापालिकांना मागे टाकत नवी मुंबई महापालिका राज्यातली मुंबई महापालिका वगळता सर्वात श्रीमंत नवी मुंबई महानगरपालिका ठरली आहे. काटकसर आणि आर्थिक नियोजन केल्याने 2 हजार कोटींची ठेवीं असणारी श्रीमंत महापालिका ठरली आहे. नवी मुंबई शहरला सायबर सिटी म्हणून ओळख निर्माण झाली असली तरी अद्याप अनेक कामांसाठी कोटयावधी रूपये खर्च होत आहेत. गेल्या काही महिन्यांपूर्वी महापालिकेतील कर्मचार्‍यांचा पगार कसा दयायचा यावर ही प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले होते. महापालिकेच्या खात्यात एखादे कोटी रुपये ही नसायचे. अश्यातच तब्बल 1500 कोटींच्या कामांचा अधिकचा बोजा महापालिकेवर पडला होता.

परिस्थितीवर मात करत, आर्थिक नियोजन सुधारले
नगरसेवकांच्या हट्टापोटी नवनविन कामे काढायची आणि त्या कामावर करोडो रूपये अनावश्यक खर्च करायचे हे नवी मुंबई महापालिकेचं नित्याचेच झाले होते. यामुळे महापालिका आर्थिक दिवाळखोरीकडे गेली होती, तर दुसरीकडे ठेकेदार कामांच्या बिलांसाठी हात पुढे करून उभे असायचे. मात्र या सर्व परिस्थितीवर मात करत, आर्थिक नियोजन, अनावश्यक खर्च टाळून मागील दीड वर्षात शहरातील अनावश्यक कामे बंद करून काटकसर आणि वसुलीवर भर दिल्याने महापालिका 2 हजार कोटींच्या ठेवीवर पोहचली आहे.

शहरातून मिळणार्‍या कराचा योग्य वापर करून आवश्यक तेवढेच विकास काम करण्याकडे भर दिला. त्याचबरोबर अनावश्यक कामांना बगल दिल्यामुळे या ठेवी जमा झाल्या आहेत. भविष्यात मेंटनन्सवर भर देत गरजेनुसार शहरातील उड्डाणपुल, भुयारी मार्ग, शाळा, पार्किंग आणि पब्लिक ट्रान्स्पोर्टवर भर दिला जाणार असल्याचे नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी सांगितले.