पुणे । महापालिकेकडे स्वतःची प्रसिद्धी यंत्रणा असतानाही नागरिकांच्या कररुपी पैशांचा चुराडा करत बाहेरून आणलेल्या प्रसिद्धी यंत्रणेने भाजपचीच कुप्रसिद्धी केली आहे. त्यामुळे संतापलेल्या मुक्ता टिळक यांनी पत्रकार परिषदेतून काढता पाय घेतल्याचे दुर्दैवी चित्र बुधवारी महापालिकेत बघायला मिळाले. येत्या आठवड्यात राबवण्यात येणार्या विविध उपक्रमांची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत हा प्रकार घडला.
सार्वजनिक गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त महापालिका विविध उपक्रम राबवत आहे. या उपक्रमांचे उद्घाटन शनिवारी (दि.12) शनिवारवाड्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात पार पडले. दरम्यान या कार्यक्रमापुरती महापालिकेच्या प्रसिद्धीची जबाबदारी घेणार्या एका खासगी यंत्रणेने भाजपच्या अंतर्गत वादावर भाष्य करणारे प्रसिद्धी पत्रक काढले. त्यामुळे महापालिकेच्यावतीने महापौर टिळक यांच्या परवानगीने असे पत्रक काढण्यात आले का, असा प्रश्न विचारला असता टिळक यांनी त्याला कोणतेही उत्तर दिले नाही. त्या यंत्रणेला महापालिका तथापि पुणेकर पैसे मोजत असल्याने प्रथम नागरीक म्हणून त्यांनी या प्रश्नाचे उत्तर द्यावे, अशी मागणी होताच त्यांनी संतापून पत्रकार परिषदेतून काढता पाय घेतला. त्याआधी महापौर टिळक आणि उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी रविवारी शहरातून दुचाकी रॅली काढण्यात येणार असल्याची माहिती दिली. या दुचाकीत चालक हेल्मेटसह सहभागी होणार का यावर त्यांनी ज्यांना वाटेल त्यांनी हेल्मेट घालावे, असे बेजबाबदार वक्तव्य केले.
स्थायी समितीच्या अध्यक्षांना कल्पनाच नाही !
स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांना या खासगी यंत्रणेसाठी किती खर्च केला असे विचारले असता त्यांनी आपल्याला या प्रकारची काही कल्पनाच नव्हती असे सांगत अंग काढून घेण्याचा प्रयत्न केला. याबाबत माहिती घेऊन काही चुकीच झाले असेल तर सांगतो, असे गुळमुळीत उत्तर देऊन वेळ मारून न्यायला ते विसरले नाहीत.
महापौर निरुत्तर
शहर केवळ या दोनच प्रभागांपुरते मर्यादित आहे का, शहरातील अन्य भाग हा पुण्याचा भाग नाही का, अन्य भागात रॅलीचा मार्ग का नाही, असा प्रश्न महापौरांना विचारले असता, त्या म्हणाल्या की, पोलिसांनी आपल्याला जो मार्ग नेमून दिला त्या मार्गावरून आपण ही रॅली नेणार आहोत. मात्र जे मार्ग ठरवले आहेत ते मार्ग पर्यावरणदृष्ट्या सर्वाधिक प्रदूषणाचे मार्ग असल्याचे पर्यावरण अहवालातच नमूद केले आहे. असे असताना याच रस्त्यांवरून एकावेळी हजार वाहनांची रॅली काढून पर्यावरण जतनाचा संदेश दिला जाणार आहे का, याविषयी विचारले असता महापौर निरुत्तर झाल्या.
असा आहे रॅलीचा मार्ग
20 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजता महापालिका भवनापासून दुचाकी रॅली निघणार असून, ती कसबा गणपती, दगडूशेठ हलवाई गणपती चौक, मंडई, शिवाजी रस्ता, स्वारगेट, सारसबाग, अभिनव चौक ते अलका चौक, शास्त्री रोड सेनादत्त पोलीस चौकी, म्हात्रे पूल, नळस्टॉप, कर्वे रोड, डेक्कन, खंडोजी बाबा चौक, गुडलक चौक, फर्ग्युसन कॉलेज रस्ता, ज्ञानेश्वर पादुका चौक, मॉडर्न कॉलेज मार्ग, झाशी राणी चौक, ओंकारेश्वर, वर्तक बाग, नारायणपेठ पोलीस चौकी, केसरीवाडा येथून मार्गक्रमण करत रमणबाग येथे रॅलीची समाप्ती होणार आहे.
रॅलीतून देणार सामाजिक संदेश
या रॅलीमधून स्मार्ट सिटी, आरोग्य, पर्यावरण, मुलगी वाचवा, स्वच्छ भारत आदी विषयांवर संदेश दिले जाणार आहेत. या रॅलीत गणेश मंडळे, अग्निशमन दलाचे विशेष बुलेट पथक सहभागी होणार आहे. याशिवाय ढोलपथक आणि अन्य संघटना, अभिनेते, अभिनेत्री, अन्य कलाकारही सहभागी होणार असल्याचे महापौरांनी यावेळी सांगितले. 22 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता पुण्याचे ग्रामदैवत कसबा गणपतीच्या महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. महापालिका भवन येथे सकाळी 8 वाजता जमून ही प्रभातफेरी कसबा गणपती येथे जाईल आणि तेथे महाआरती होईल, असे महापौरांनी यावेळी सांगितले. पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते ही आरती होणार आहे.