पिंपरी-चिंचवड : चिखली परिसरातील कचरा गेल्या 15 दिवसांपासून उचलण्यात आलेला नाही. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य धोक्यात आले आहे. या परिसरात कचर्याची समस्या अतिशय गंभीर झाली आहे. यासंदर्भात वेळोवेळी तक्रारी करुनही महापालिका प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याने येथील नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दत्ता साने यांनी गुरुवारी परिसरात कचरा ट्रॅक्टरमध्ये गोळा करून हा कचरा चक्क महापालिका इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ आणून टाकत ‘कचरा फेको’ आंदोलन केले. याबाबत महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे यांना निवेदन देण्यात आले. येत्या दोन दिवसात जर चिखली परिसरातील कचरा उचलला नाही; तर पुन्हा महापालिकेत कचरा आणून टाकू, असा इशारा साने यांनी दिला.
सर्वसाधारण सभेपूर्वी आंदोलन
महापालिकेची गुरुवारी सर्वसाधारण सभा होती. या सभेपूर्वीच दत्ता साने यांनी प्रभागातील कचरा आणून महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर टाकला. चिखली परिसरातील कचरा गेल्या 15 दिवसांपासून उचलेला नाही. प्रभागातील कचरा उचलणार्या 70 टक्के घंटागाड्या नादुरुस्त आहेत. साठलेल्या कचर्यामुळे प्रभागात दुर्गंधी पसरली आहे. नागरिकांना त्रास होत आहे. महापालिका प्रशासनाला त्याची जाणीव व्हावी, यासाठी महापालिका प्रवेशद्वाराजवळ कचरा फेकला, असे दत्ता साने यांनी सांगितले.