महापालिकेच्या मोटारसायकल रॅलीचा पावसामुळे फज्जा

0

पुणे । गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून महापालिकेच्यावतीने आयोजित केलेल्या मोटारसायकल रॅलीचा पुरता फज्जा उडाल्याचे विदारक दृश्य रविवारी बघायला मिळले. विरोधक तर लांबच पण सत्ताधारी पक्षाचेही 90 टक्के नगरसेवक अनुपस्थित असल्याने गर्दी अभावी पालकमंत्री गिरिश बापट यांनीही उद्घाटन न करताच कार्यक्रमस्थळावरून माघारी जाणे पसंत केले.

गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्ताने महापालिकेने विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. त्यात जवळपास 1000 वाहनांच्या सहभागात मोटारसायकल रॅलीचे रविवारी आयोजन करण्यात आले होते. मात्र शनिवारी रात्रीपासून सलग पाऊस सुरू असल्यामुळे रॅलीला अतिशय कमी प्रतिसाद मिळाला. केवळ 100 व्यक्तींच्या सहभागात ही रॅली उरकून टाकण्याची दुर्दैवी वेळ सत्ताधार्‍यांवर आली. आश्चर्य म्हणजे वारंवार निरोप देऊनही भाजपचे बहुतांश नगरसेवक अनुपस्थित राहिले होते.

पालमंत्र्यांचा काढता पाय
सकाळी 7.30 वाजल्यापासून पावसातच महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी, पोलिस, महापालिकेच्या आवारात थांबले होते. पालकमंत्री गिरीश बापटही 8 च्या सुमारास पोहचले. पाठोपाठ महापौर टिळक, सभागृहनेते श्रीनाथ भिमाले आणि स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ पोहचले. बापट सुमारे पाऊण तास थांबल्यावर पावणे नऊच्या सुमारास पुढच्या कार्यक्रमाला रवाना झाले. त्यांनी झेंडा न दाखवताच जाणे पसंत केले. त्यानंतर 9च्या सुमारास महापौरांनी झेंडा फडकविल्यावर रॅलीला सुरुवात झाली.

रॅलीला उपमहापौरांची दांडी
भाजपच्या नगरसेवकांनी त्यांच्यासमवेत किमान 5-10 कार्यकर्त्यांना घेऊन यावे, असे बजावण्यात आले होते. पण ऐनवेळी फक्त प्रवीण चोरबेले, प्रसन्न जगताप, मंगला मंत्री, सुशील मेंगडे, विशाल धनवडे हजर दिसले. उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, पक्षाचे स्थायी समितीमधील नगरसेवक, महिला व बालकल्याण, शहर सुधारणा, क्रिडा समिती, विधी समितीचे अध्यक्ष आणि सदस्य, पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवकही अनुपस्थित होते. त्यामुळे सत्ताधारी भाजपने पुढाकार घेऊन आयोजित केलेल्या रॅलीला त्यांच्याच पक्षातील नगरसेवकांनी लाल झेंडा दाखवल्याचे दिसून आले.