महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये वॉटर एटीएम मशीन बसवू का?

0

जलकल्याण समितीने आयुक्तांकडे मागितली परवानगी

पिंपरी-चिंचवड : महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये वॉटर एटीएम मशीन बसविण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण समितीने महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे. हे मशीन बसविण्याचा सर्व खर्च करण्याची समितीने तयारी दर्शविली आहे.

एक-दोन रुपयांत शुद्ध पाणी
यासंदर्भात समितीने निवेदनात म्हटले आहे, महापालिकेच्या सर्व रुग्णालयांत गोरगरीब रुग्ण उपचारासाठी येत असतात. यातील अनेक रुग्णांकडे अगदी माफक दर असलेले केसपेपर काढण्यासाठी तसेच औषधोपचारासाठी देखील पैसे नसतात. असे रुग्ण पिण्यासाठी 20 रुपये किंमतीची पाण्याची बाटली घेऊ शकत नाहीत. त्यामुळे महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये येणार्‍या रुग्णांना एक ते दोन रुपयांत पिण्याचे शुद्ध पाणी मिळाल्यास त्यांचे आरोग्य चांगले होण्यास मदत होईल. ही बाब लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने सर्व रुग्णालयांमध्ये वॉटर एटीएम मशीन बसविण्याची जलकल्याण समितीला परवानगी द्यावी. हे मशीन बसविण्याचा सर्व खर्च समितीमार्फत केले जाईल. तसेच मशीनच्या देखभाल दुरूस्तीची जबाबदारीही समिती घेईल.

या शिष्टमंडळाची भेट
आयुक्तांना निवेदन देताना जलकल्याण समितीचे प्रकल्प प्रमुख नंदकिशोर डंबे, सहप्रकल्प प्रमुख संतोष निंबाळकर, अध्यक्ष डॉ. राजीव पटवर्धन, उपाध्यक्ष समीर पाटील, डॉ. गीता आफळे, कार्यवाह योगेश थेटे, आरोग्य प्रकल्प प्रमुख डॉ. अविक्षित काळे, कार्यालय प्रमुख भालचंद्र देशपांडे, निधी व संपर्कप्रमुख चिन्मय कवी आदी उपस्थित होते.