महापालिकेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

0

गणवेश, स्वेटर, वह्या, पुस्तकांचे वितरण

पिंपरी : आजचे विद्यार्थी हे उद्याचे भविष्य घडविणार असून शासनाकडून विद्यार्थ्यांसाठी सर्वोतोपरी मदत करण्यात येत आहे. शालेय साहित्यांपासून सर्व खर्च शासनाकडून होत असल्याने विद्यार्थ्यांनी मन लावून अभ्यास केल्यास यश निश्‍चित मिळेल, असे प्रतिपादन पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी व्यक्त केले. शुक्रवारी (दि. 15) नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली आहे. त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव साजरा झाला. शाळेच्या पहिल्याच दिवशी पिंपरी-चिंचवड महापालिका अंतर्गत येणार्‍या 130 शाळांमधील मुलांना शैक्षणिक साहित्य यामध्ये गणवेश, पीटी गणवेश, स्वेटर, वह्या, पुस्तके वाटपाच्या उपक्रमाला पिंपळे गुरव येथील शाळा क्रमांक 54 येथे सुरुवात झाली.

यावेळी, स्थायी समिती सदस्य विलास मडिगेरी, शहर भाजपा प्रवक्ते अमोल थोरात, नगरसेविका उषा मुंडे, स्थायी समिती सदस्य सागर आंगोळकर, अतिरिक्त आयुक्त प्रवीण आष्टीकर, प्रशासन अधिकारी ज्योस्ना शिंदे, नगरसेविका माधवी राजापूरे यांच्यासह शाळेतील शिक्षक व पदाधिकारी उपस्थित होते.

साहित्य वाटपात राज्यात प्रथम
प्रशासन अधिकारी ज्योस्ना शिंदे म्हणाल्या की, राज्यभरात 15 जून रोजी शाळा सुरु झाल्या असून पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 130 शाळांमध्ये शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला आहे. बालवाडी ते आठवी वर्गांच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटण्यात येत असून विद्यार्थ्यांच्या उपस्थितीनुसार साहित्य देण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका शैक्षणिक साहित्य वाटपात राज्यात प्रथम क्रमांकाची ठरली आहे.