पिंपरी-चिंचवड : महापालिका प्रशासन नवीन गगन चुंबी इमारतीचे बांधकाम करण्यासाठी परवानग्या देत आहे. परंतु, परवानगी देण्याअगोदर प्रशासनाने येथील पाण्यासह इतर मूलभूत सुविधा, भविष्याचा वाढता विस्तार आणि नागरीकरण लक्षात घेऊन सर्व सुविधा निर्माण कराव्यात. किंवा प्रशासनाने बांधकाम व्यावसायिकांना दिलेल्या परवानग्या त्वरित रद्द कराव्यात व परिसरात सुरू असलेली बांधकामे त्वरित थांबवावीत. अन्यथा पालिका प्रशासनाच्या विरोधात न्यायालयात धाव घेणार असल्याचा इशारा, नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांना दिला आहे.
प्रशासनाला गांभीर्य नाही
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड परिसराला रावेत बंधार्यातून अनेक वर्षांपासून पाणीपुरवठा होत असताना रावेतकरांची मात्र तहान भागत नाही. शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता येथील बंधार्याची उंची वाढविण्याची आवश्यकता आहे. बंधार्यातून होणार्या पाणी गळतीबाबत प्रशासनास वारंवार कल्पना देऊनसुद्धा प्रशासन गांभीर्याने पाहत नाही. रावेत प्रभागात असणार्या पाणी, वीज, रस्ते व इतर असुविधांबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांना भेटून समस्या मांडल्या आहेत. परंतु, प्रशासन वेळकाढूपणा करीत वेळ मारून नेत असल्याचा आरोपही, भोंडवे यांनी केला आहे.