महापालिकेच्या सहा क्षेत्रीय कार्यालयांची फेररचना!

0

पिंपरी-चिंचवड : तीन महिन्यांपूर्वी झालेल्या पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी प्रभागांची फेररचना करण्यात आली होती. त्यानुसार, चार सदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार ही निवडणूक पार पडली. आता निवडणुकीनंतर प्रशासकीय कामकाजाच्या सोयीच्या दृष्टीनेदेखील सहा क्षेत्रीय कार्यालयांची फेररचना करण्यात आली आहे. ‘अ’ आणि ‘क’ क्षेत्रीय कार्यालयात प्रत्येकी सहा निवडणूक प्रभागांचे कामकाज, तर ‘ब’, ‘ड’, ‘इ’ आणि ‘फ’ या चार क्षेत्रीय कार्यालयांतून प्रत्येकी पाच निवडणूक प्रभागांचे कामकाज चालणार आहे, अशी माहिती महापालिका सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

1997 मध्ये प्रभाग कार्यालयांची निर्मिती
महापालिका प्रशासनाच्या प्रशासकीय कामकाजासाठी सन 1997 मध्ये चार प्रभाग कार्यालयांची निर्मिती करण्यात आली होती. त्यानंतर महापालिकेचे तत्कालीन आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी कामकाजाच्या विकेंद्रीकरणासाठी आणखी दोन प्रभाग कार्यालयांची निर्मिती केली. या सहा प्रभागांना क्षेत्रीय कार्यालय संबोधण्यात यावे, यासाठी सन 2012 मध्ये सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर करण्यात आला आहे. त्यानुसार गेल्या पाच वर्षांपासून महापालिका मुख्यालय आणि सहा क्षेत्रीय कार्यालयांतून प्रशासनाचा गाडा चालविला जात होता.

भौगोलिकदृष्ट्या सलगतेसाठी पुनर्रचना
मात्र, फेब्रुवारी 2017 मध्ये निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने महापालिका निवडणूक घेण्यात आली. त्यानुसार शहरात एकूण 32 प्रभाग तयार झाले आहेत. ही प्रभाग रचना होत असताना पूर्वीच्या सहा क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत बदल झाले. त्यामुळे प्रशासकीय कामकाजात अडथळा येऊ नये, तसेच नागरिकांना नागरी सुविधा पुरविणे सोयीचे व्हावे, यासाठी क्षेत्रीय कार्यालयांची प्रशासनाकडून पुनर्रचना करण्यात आली आहे. भौगोलिकदृष्ट्या सलगता पाहून ही पुनर्रचना करण्यात आली आहे. त्याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला आहे. त्या प्रस्तावाला आता सर्वसाधारण सभेची मान्यता घेतली जाणार आहे.

असे चालेल कामकाज
महापालिका प्रशासनाने नव्याने केलेल्या पुनर्रचनेनुसार निगडी-प्राधिकरण येथील भेळ चौकात असलेल्या ‘अ’ क्षेत्रीय कार्यालयातून निवडणूक प्रभाग क्रमांक 10, 13, 14, 15, 16 आणि 17, चिंचवड, लिंकरोड येथील एल्प्रो कंपनीच्या आवारात असलेल्या ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयातून निवडणूक प्रभाग क्रमांक 18, 19, 21, 22 आणि 27, नेहरूनगर येथील हॉकी स्टेडियम शेजारी असलेल्या ‘क’ क्षेत्रीय कार्यालयातून निवडणूक प्रभाग क्रमांक 8, 20, 29, 30, 31 आणि 32, औंध-रावेत रस्त्यावर रहाटणी येथे असलेल्या ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयातून निवडणूक प्रभाग क्रमांक 23, 24, 25, 26 आणि 28, पुणे-नाशिक रस्त्यावर पांजरपोळ संस्थेसमोर असलेल्या ‘इ’ क्षेत्रीय कार्यालयातून निवडणूक प्रभाग क्रमांक 3, 4, 5, 6 आणि 7 तसेच निगडीतील टिळक चौकाशेजारील प्राधिकरणाच्या जुन्या इमारतीमध्ये असलेल्या ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयातून 1, 2, 9, 11 आणि 12 या पाच निवडणूक प्रभागांचे कामकाज चालणार आहे.