महापालिकेच्या सुपरस्पेशालिटी उपचार केंद्रात ‘बोन मॅरो ट्रान्सप्लांट’ सुविधा

0

मुंबई । ’थॅलेसेमिया’ग्रस्त रुग्णांमध्ये योग्य त्या प्रमाणात रक्त तयार होत नसल्याने त्यांना नियमितपणे रक्त देण्याची गरज असते. मात्र, या रुग्णांमध्ये अनुरुप बोन-मॅरोच प्रत्यारोपण यशस्वीपणे करण्यात आल्यास त्यांचे शरीर आवश्यक त्या प्रमाणात रक्त पेशी, पांढर्‍या पेशी व प्लेटलेट्स तयार करु लागते. परिणामी, संबंधित रुग्ण थॅलेसेमिया मुक्त होऊन आपले पुढील आयुष्य सामान्यपणे जगू शकतात. ही बाब लक्षात घेऊन महापालिकेने बोरिवली पूर्व परिसरात गेल्या वर्षी सुरू केलेल्या ’सुपरस्पेशालिटी’ उपचार केंद्रात मार्च 2018 पासून ’बोन-मॅरो’ प्रत्यारोपणाची सुविधा देण्यात येणार आहे. यामुळे खासगी रुग्णालयात सुमारे 20 ते 25 लाख रुपये एवढा खर्च अंदाजित असणारी ही सुविधा गरजु रुग्णांना आता जवळजवळ मोफत स्वरुपात मिळू शकणार आहे. त्याचबरोबर या उपचार केंद्रात बालकांमधील रक्तदोष, कर्करोग यावरदेखील उपचार करण्याची सुविधा उपलब्ध आहे, अशी माहिती उपचार केंद्राच्या संचालिका डॉ. ममता मंगलानी यांनी दिली आहे.

थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांमध्ये लाल पेशी दुषित असल्यामुळे, त्यांच्या शरीरात योग्य त्या प्रमाणात रक्त तयार होत नाही. त्यामुळे त्यांना नियमितपणे अनुरुप रक्तदात्याचे रक्त घेऊन लाल पेशी द्याव्या लागतात. तथापि, अशा रुग्णांच्या शरीरात अनुरुप ’बोन-मॅरो’चे प्रत्यारोपण यशस्वीपणे केल्यास त्यांचे शरीर आवश्यक त्या प्रमाणातील पेशींसह रक्त तयार करू लागते.ज्यामुळे ’बोन-मॅरो’च्या यशस्वी प्रत्यारोपण झाल्यानंतर या रुग्णांना रक्त देण्याची आवश्यकता भासत नाही व रुग्ण थॅलेसेमिया मुक्त होतो’बोन-मॅरो ट्रान्सप्लांट’ हे सामान्यपणे 8 वर्षे वयापर्यंतच्या मुलांमध्ये केला गेल्यास चांगले परिणाम मिळतात तसेच रुग्णाच्या भावाचा किंवा बहिणीचा ’बोन-मॅरो’ अनुरुप ठरण्याची शक्यता अधिक असते. या प्रत्यारोपणामुळे रुग्ण थॅलेसेमिया मुक्त होण्याची शक्यता साधारणपणे 80 ते 90 टक्के असते.’बोन-मॅरो’ प्रत्यारोपणासाठी ’एचएलए’ अनुरुप असल्याची चाचणी करणे आवश्यक असते. ही चाचणी बाहेरच्या प्रयोगशाळेतून करुन घेण्याची सोय उपचार केंद्रात करण्यात आली आहे. या चाचणीसाठी रु. 5 हजार प्रति चाचणी एवढे शुल्क संबंधित प्रयोगशाळेद्वारे आकारले जाते. तथापि, दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील मुलांसाठी ही सुविधा मोफत असणार आहे तसेच आर्थिकदृष्ट्या आव्हानात्मक परिस्थिती असणा-या मुलांकडून शुल्क न घेता दानशूर संस्थांच्या मदतीतून हा खर्च भागविला जाणार आहे.

’बोन-मॅरो’ अनुरुप असल्याची चाचणी सकारात्मक आल्यानंतर ’बोनमॅरो ट्रान्सप्लांट’ करण्यासाठी अंदाजे रु. 12 लाख प्रति रुग्ण एवढा खर्च अपेक्षित आहे. मात्र, दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील मुलांसाठी कोणतेही शुल्क घेतले जाणार नाही तसेच रुग्ण दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील नसल्यास त्यांना यथाशक्ती शुल्क भरण्यास विनंती करण्यात येईल. त्यांनी त्यांच्या क्षमतेनुसार योग्य ती रक्कम जमा केल्यानंतर उर्वरित रक्कमेसाठी दानशूर संस्थांच्या मदतीतून उपचारांचा खर्च भागवला जाणार आहेमहापालिकेच्या सुपरस्पेशालिटी उपचार केंद्रात लवकरच सुरु होणार्‍या ’बोन-मॅरो’ प्रत्यारोपणासाठी सध्या 15 रुग्णांची नावे नोंदविण्यात आली आहेत.