महापालिकेच्या सूचीत 42 प्रकल्पांची नोंद

0

प्रक्रिया प्रकल्पासाठी मोठ्या सोसायट्यांना मदत

पुणे : महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील विविध उपाय – योजनांच्या अंतर्गत घरे, सोसायट्या, शाळा, हॉटेल्स तसेच विविध संस्था, कंपन्यांच्या हद्दीतच ओला कचरा कसा जिरविला जावा, यासाठी अशा शहरातील सुमारे 42 वेगवेगळ्या प्रकल्पांची सूची करण्यात आली आहे. या प्रकारचे प्रकल्प उभारणार्‍या सोसायट्या व्यक्ती तसेच संस्थाच्या माहिती महापालिकेकडून संकलित करण्यात येत होती. त्यात हे प्रकल्प निश्चित करण्यात आले आहेत. दरम्यान, या सर्व प्रकल्पांचे सादरीकरण महापालिकेत करण्यात आले असून या प्रकल्पांचे प्रदर्शन पुढील आठ महिन्यांत शहरात वेगवेगळ्या 20 ठिकाणी भरविले जाणार आहे.

42 प्रकल्पांचे भरविले प्रदर्शन

घनकचरा व्यवस्थापन नियमावली-2016 च्या अनुषंगाने बल्क वेस्ट जनरेटर म्हणजेच 100 किलोपेक्षा जास्त कचरा निर्माण करणार्‍या सोसायट्या, संस्था, हॉटेल्स यांनी ओला कचरा स्वत:च्या हद्दीतच जिरविणे बंधनकारक आहे. मात्र, अनेकदा या सोसायट्या अथवा संस्थांना हे काम करण्यासाठी मार्गदर्शन नसते. त्यामुळे कचरा व्यवस्थापनाकडे सोसायट्या दुर्लक्ष करतात. ही बाब लक्षात घेऊन 1 किलो ते 1 हजार किलोदरम्यान ओला कचर्‍यावर प्रक्रिया करणार्‍या सोसायट्या, व्यक्ती, संस्था, कंपन्यांची सूची करण्याचे काम घनकचरा व्यवस्थापन विभागाने हाती घेतले आहे. त्या अंतर्गत महापालिकेकडे सुमारे 52 जणांनी नोंदणी केली होती. त्यातील 42 जणांनीच आपल्या प्रकल्पाचे सादरीकरण केले आहे. त्यानंतर आता प्रशासनाकडून शहरातील पालिकेच्या 15 क्षेत्रीय कार्यालये तसेच शहरात एकाच पाच वेगवेगळ्या ठिकाणी या 42 प्रकल्पांचे प्रदर्शन भरविले असून त्यात मोठ्या सोसायट्या, संस्था तसेच ओला कचरा निर्माण होणार्‍या आस्थापनांना आमंत्रित केले जाणार आहे.