पिंपरी-चिंचवड : महापालिकेच्या माध्यमिक शाळेत मुख्याध्यापकांची वाणवा झाली आहे. एकूण शाळांपैकी 35 शाळांना एकत्रीकरणानंतरही मुख्याध्यापक मिळत नसल्याने शाळा व्यवस्थापनाच्या कारभाराला कोणी वाली नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. शाळेच्या संबंधित त्रिसदस्यीय समितीला शाळांना मुख्याध्यापक नेमणुकीचे आदेश द्यावेत, अशी मागणी मनसेचे पिंपरी विभाग अध्यक्ष राजू भालेराव यांनी केली आहे.
‘मनसे’चे आयुक्तांना निवेदन
यासंदर्भात भालेराव यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. त्यात नमूद केले आहे की, शहरात मनपाच्या 136 शाळांपैकी 35 ते 40 शाळांमधील मुख्याध्यापक गेल्या तीन वर्षांपासून रिक्त आहेत. रोस्टर पूर्ण न केल्यामुळे ही पदे भरली नाहीत. आता रोस्टरही पूर्ण झाल्याचे समजते. याआधारे कार्यरत शिक्षकांची मुख्याध्यापक पदावर पदोन्नती देण्यासाठी शिक्षण मंडळाने त्रिसदस्यीय समिती नेमली आहे. या समितीला रिक्त मुख्याध्यापकांची पदे भरण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी भालेराव यांनी निवेदनाद्वारे केली आहे.