मुंबई । तानसा पाइपलाइनलगत महापालिकेतर्फे ‘सायकल ट्रॅक’ बनवण्यासाठी येणारा एकूण 320 कोटींचा खर्च कमी करा, अशी मागणी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी गटनेत्यांच्या बैठकीत आयुक्तांकडे केली. मात्र हा ’सायकल ट्रॅक’ बनवण्यासंबंधी आयुक्तांनी गटनेत्यांना सादर केलेले सादरीकरण उत्तम होते, असे सांगत हा ‘ट्रॅॅक’ बांधण्यासाठी काही गटनेत्यांनी सकारात्मकता दाखवली आहे. सायकल ट्रॅक बांधण्यासाठी प्रति किलोमीटरसाठी 11 कोटी रुपये याप्रमाणे 30 किलोमीटरसाठी 320 कोटी रुपये इतकी प्रचंड रक्कम खर्च करण्यात येणार आहे. महापालिका प्रशासनाने या प्रस्तावासंबंधी प्रशासकीय पातळीवर निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. त्याबाबत लोकप्रतिनिधींशी पालिका प्रशासनाने अशा प्रकारचा परस्पर निर्णय घेणे लोकशाही मूल्ये पायदळी तुडवण्यासारखे आहे, असा आक्षेप रवी राजा यांनी घेतला होता.
प्रायोगिक पातळीवर 1 कि.मी.पर्यंतचा ट्रॅक बांधण्याची मागणी
एवढा मोठा निर्णय घेताना प्रशासनाने गटनेत्यांच्या सभेपुढे औपचारिक चर्चा करणे आवश्यक होते. जगामध्ये मुख्य रस्त्याला लागूनच सायकल ट्रॅक बांधण्यात येतो. परंतु, मुंबईमध्ये हा ’सायकल ट्रॅक’ तानसा पाइपलाइनलगत बांधण्यात येत आहे. जगामध्ये 1 किलोमीटर लांबीचा सायकल ट्रॅॅक बनवण्यासाठी 11 कोटी रुपये कोठेही खर्च आलेला नाही, असा आक्षेप राजा यांनी घेऊन एवढा मोठी निधी खर्च करण्यापूर्वी प्रायोगिक तत्त्वावर 1 किलोमीटर सायकल ट्रॅॅक बांधून तो गटनेत्यांना दाखवण्यात यावा, अशी मागणी राजा यांनी महापौरांना लिहिलेल्या पत्रात केली होती. 1 किलोमीटरच्या ’ट्रॅॅक’साठी येणारा 11 कोटींचा खर्च जास्त आहे. तो कमी करण्याची मागणी राजा यांनी केल्याचे समजते.