महापालिकेतील कनिष्ठ लिपिकाला लाच घेताना अटक

0

पिंपरी-चिंचवड : महापालिकेतील लेखा विभागाच्या कनिष्ठ लिपिकाला चार हजारांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंध विभागाच्या पोलिसांनी शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास रंगेहाथ अटक केली आहे. ही कारवाई पालिकेतील लेखा विभागात करण्यात आली. प्रकाश जयसिंग रोहकले (वय-39, रा. पिंपळे गुरव) असे अटक करण्यात आलेल्या लिपिकाचे नाव आहे.

महापालिकेत रचला सापळा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराकडे महापालिकेच्या शाळेत बायोमॅट्रिक मशीन दुरुस्तीचे कंत्राट होते. याच कंत्राटाचे 1 लाख 64 हजार रुपयांच्या बीलाच्या फाईलवर वरीष्ठांची स्वाक्षरी घेऊन धनादेश दोतो असे सांगून तक्रारदाराकडे 4 हजार रुपयांची मागणी केली. तक्रारदाराने याची तक्रार लाच लुचपत प्रतिबंध विभागाकडे केली होती. या विभागाच्या पोलिसांनी आज पालिकेतील लेखा विभागात सापळा रचून त्याला लाच घेताना रंगेहाथ पकडले. ही कारवाई पोलीस निरीक्षक अरुण घोडके, सुरेखा घार्गे यांनी केली.

या वर्षांतील आठवा कर्मचारी
चालू वर्षात म्हणजे 2017 मध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रशासनाचा लाच घेताना पकडला गेलेला हा सातवा ते आठवा कर्मचारी आहे. यामध्ये लिपीक ते थेट महापालिका आयुक्ताच्या लघुलेखकाचा समावेश आहे.