महापालिकेतील कर्मचार्‍यांच्या काम बंद आंदोलनात पहिल्याच दिवशी फुट

0

जळगाव । मागील 4 वर्षांपासून महापालिकेकडे वेतन व पेन्शनसह सुमारे 4 कोटी रुपये थकले आहे. यामुळे संतप्त झालेल्या महापालिका कर्मचारी संघटनेने कामबंदचे हत्यार उपसले असून आज महापालिकेतील सर्व कर्मचार्‍यांनी काळ्या फित लावून कामकाज केले. तर उद्या मंगळवार 17 रोजी लेखणी बंद आंदोलन केले जाणार आहे. मात्र, आज महापालिकेच्या परिसरात अखिल भारतीय सफाई मजदूर संघाच्या भूमिकेवर इतर संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी नाराजी व्यक्त केली. प्रशासानाने कर्मचार्‍यांचे वेतन व पेन्शन 1 महिन्यात करण्याची तयारी महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष रामुजी पवार यांच्याकडे 4 एप्रिल रोजी दाखवलेली असतांना आंदोलन का पुकारण्यात आले असा सवाल इतर संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी उपस्थित केला.

कर्मचार्‍यांचा बळी जावू नये
आज अखिल भारतीय सफाई मजदूर संघाची गाळेलीलाव करून कर्मचार्‍यांचे पेन्शन व वेतन देण्याची मागणी अयोग्य असल्याचे इतर संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी मत व्यक्त केले. यावरून आंदोलनात फुट पडल्याचे दिसून येत आहे. याबाबत अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिलीप चांगरे यांनी प्रभारी आयुक्तांना पत्र दिले आहे. या पत्रात त्यांनी स्पष्ट केले आहे की, प्रशासनाने गाळेधारकांच्या वादात कर्मचार्‍यांचा बळी जावू नये अशी मागणी केली आहे.

कामबंदने प्रश्‍न सुटणार नाही
महापालिकेत केवळ अखिल भारतीय सफाई मजदूर संघ ही संघटना कार्यरत नसून अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस ही सर्वांत जुनी संघटना असल्यचेही नमुद केले आहे. कर्मचार्‍यांनी कामबंद आंदोलन करून प्रश्‍न सुटणार नसल्याचेही चांगरे यांनी स्पष्ट केले आहे. नियमानुसार कामबंद आंदोलनासाठी परवानगी मागावी लागते मात्र, स्वतःच्या स्वार्थासाठी निष्पाप कर्मचार्‍यांचा बळी जावू नये अशी मागणी केली आहे.

प्रशासनाकडे बरेच पर्याय
महापालिकेची कराची रक्कम ही गाळेधारकांकडे घेणे आहे हे जरी सत्य असले तरी प्रशासनाकडे वसुलीचे बरेच पर्याय असतांना कर्मचार्‍यांनी कामबंद आंदोलन करून प्रश्‍न सुटणार नसल्याचे नमुद करण्यात आले आहे. निवेदनांवर राष्ट्रीय महामंत्री जयप्रकाश चांगरे, प्रदेश अध्यक्ष अरूणभाई चांगरे, प्रदेश महासचिव जितेंद्र चांगरे, जिल्हाध्यक्ष दिलीप चांगरे, शहराध्यक्ष अमरसिंग राणवे, राकेश सनकत, प्रकाश सनकत, संजय सनकत, अजय सनकत, मनपा कामागर संघाचे अध्यक्ष पी.जी. पाटील आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.

आंदोलन शहराच्या हितासाठी
मनपा कर्मचार्‍यांनी पुकारलेले कामबंद आंदोलन आम्हाला थकीत वेतन व महागाई भत्ते मिळावे यासाठी केले जात नाही आहे. यामुळे मनपावर असलेले हुडको व जिल्हा बँकेचे कर्ज देखील लिलावातून येणार्‍या रक्कमेतून कर्ज फेडू शकतात. तसेच आलेल्या पैशातून शहरात विविध विकास कामे होतील. त्यामुळे शहराचा हितासाठी आमचे कामबंद आंदोलन आहे. असे मत अखिल भारतीय सफाई मजदूर संघाचे जिल्हाध्यक्ष अजय घेंगट यांनी व्यक्त केले.