विकसित केलेल्या शाळांची करणार पहाणी
पिंपरी : आम आदमी पक्षाच्या सरकारने दिल्लीतील शाळांमध्ये अतिशय योग्यपद्धतीने सुधारणा केल्या आहेत. त्यामुळे शाळांचा दर्जा उंचावला आहे. त्यामुळेच पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी महापालिकेतील पदाधिकारी आणि शिक्षण समितीचे सदस्य रविवारी (दि.7) दिल्लीतील शाळा पाहण्यासाठी जाणार आहेत. केजरीवाल सरकारने दिल्लीतील शाळांचा दर्जा सुधारला आहे. शिक्षकांना प्रशिक्षण दिले. शिक्षकांना प्रोत्साहन देऊन चांगल्या शिक्षकांना प्रत्येकी चार ते पाच शाळा सुधारण्याची जबाबदारी देण्यात आली होती. त्यामुळे दिल्लीच्या शिक्षणाचा दर्जा सुधारला आहे. दिल्ली मॉडेलने देशापुढे आदर्श ठेवला आहे. शिक्षणासाठी देशात दिल्लीचे मॉडेल स्वीकारण्याची गरज आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेतील शिक्षण समितीचे सदस्य आणि सर्व पक्षाच्या गटनेते दिल्लीतील शाळांची पाहणी करणार आहेत. महापालिका अधिकारी आणि पदाधिकार्यांचा हा दोन दिवसांचा दिल्ली दौरा असणार आहे. रविवारी (दि.7) गटनेते, शिक्षण समितीचे पदाधिकारी दिल्लीला रवाना होणार आहेत. सोमवार आणि मंगळवार असे दोन दिवस दिल्लीतील शाळांची पाहणी करणार आहेत.
हे देखील वाचा
शिक्षणाचा दर्जासाठी प्रयत्न
याबाबत बोलताना सभागृह नेते एकनाथ पवार म्हणाले की, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठीच सर्वपक्षाचे गटनेते आणि शिक्षण समितीचे पदाधिकारी दिल्लीतील शाळांची पाहणी करणार आहोत. केजरीवाल सरकारने तेथे महापालिकेच्या शाळांमध्ये अत्यंत कल्पक आणि अभिनव असे उपक्रम राबविले आहेत. तसे उपक्रम आपल्या राज्यातील महापालिका शाळांमध्ये राबवून शाळांमधील शिक्षण चांगल्या दर्जाचे होईल. तेथील नाविन्यपूर्ण उपक्रम पालिकेच्या शाळांमध्ये राबविण्यात येतील. दुसर्या टप्प्यात मुख्याध्यापकांना शाळा पाहणीसाठी पाठविण्यात येणार आहे.