महापालिकेतील निलंबनाचा‘कचरा’ !

0

जळगाव। मक्तेदाराने दैनंदिन सफाई न केल्याने काल आयुक्त जीवन सोनवणे यांनी मुख्य स्वच्छता निरीक्षक अशोक नेमाडे, युनिट प्रमुख दिनेश गोयर व मुकादम यशवंत काळे यांना निलंबित केले. या कारवाईमुळे महापालिकेतील पूर्ण स्वछ्छता विभागच संतापला असून ही कारवाई अन्यायकारक असल्याचे सांगणार्‍या आज महापौर व उपमहापौरांना या कर्मचार्‍यांनी दिलेल्या निवेदनात त्यांनी महापालिकेच्या बेपर्वाईची लक्तरेच वेशीवर टांगली आहेत. सर्व आरोग्य अधिक्षक, मुख्य निरीक्षक, निरीक्षक, युनिट प्रमुखांनी दिलेल्या या निवेदनात म्हटले आहे की, 3 हजार 236 कामगारांची गरज असूनही फक्त 925 जणांवर शहराच्या स्वच्छतेचा ताण पडतो, या मुद्द्याचे मनपा प्रशासन काय उत्तर देणार आहे. दरम्यान, कर्मचार्‍यांनी उपमहापौर ललित कोल्हे यांची भेट घेतली.

रजेवर असलेलाही तडाख्यात!
वार्ड क्र. 3 शिवाजीनगर येथे पाहणीसाठी उपायुक्त लक्ष्मीकांत कहार व आरोग्य अधिकारी डॉ. विकास पाटील गेले होते. तेथे अस्वच्छता दिसल्याने ही निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. या कारवाईला कर्मचार्‍यांनी विरोध करून महापौर, उपमहापौर यांना शनिवारी निवेदन दिले . ज्या तिघांवर जबाबदारी निश्‍चित करून निलंबित करण्यात आले त्यांच्यापैकी मुकादम यशवंत काळे यांची बदली शिवाजीनगरातून तांबापुरा युनीटला झालेली आहे. यशवंत काळेे 15 मेपासून रजेवर आहेत. त्यांची रजा 3 जूनला संपणार आहे. तरीही त्यांना निलंबित कसे करण्यात आले, असा प्रश्‍न उपस्थित करण्यात येत आहे.

काळेंनी नोटीस नाकारली
सफाई केली नाही म्हणून संबंधित मक्तेदारावर दंडात्मक कारवाईदेखील करण्यात आलेली आहे. मक्तेदारावर कारवाई केल्याने कर्मचार्‍यांनी कर्तव्यात कसूर केलेला नाही, हे प्रशासनाच्या लक्षात आले नाही का?,असा प्रश्‍नही या निवेदनात करण्यात आलेला आहे. ही कारवाई मागे घेतल्यास अनिश्‍चित काळासाठी सामुहीक रजा, सामुहिक राजीनामे देण्यात येतील अशा इशारा निदेवनाद्वारे देण्यात आला आहे. दरम्यान, काळे यांनी निलंबनाची नोटीस स्वीकारली नसल्याचे समजते.

इतरांमध्ये रोष अन् भितीही…
मक्तेदाराला दुपारी 2 वाजेपर्यंत शहरात साफसफाई करण्याची वेळ देण्यात येते. यानंतर त्याने सफाई केली नसेल तर अशा मक्तेदारावर दंडात्मक कारवाई करण्यात येत असते. दुपारी 2 वाजेनंतर संबंधित मक्तेदारावर दंडात्मक कारवाई केलेली आहे. मक्तेदाराकडून दंड घेऊनही निलंबनाची कारवाई करण्यात आल्याने कर्मचार्‍यांनी नाराजी व्यक्त केली. प्रामाणिकपणे काम करूनही निलंबन होत असल्याने कर्मचार्‍यांमध्ये रोष पाहावयास मिळाला. तिघांचा दोष नसतांना त्यांच्या कारवाई करण्यात आल्याने इतर कर्मचार्‍यांमध्ये हे प्रशासकीय राजकारण असल्याच्या भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही कारवाई अन्यायकारक असून याविरोधात सर्व 14 आरोग्य निरीक्षक सामुहीक राजीनामे देणार आहेत.

485 किमी रस्ते, 632 किमी गटारी
राज्य सरकारच्या मार्गदर्शक सुचनेप्रमाणे शहरात 485 किमी रस्ते, 632 किमी गटारींच्या स्वच्छतेसाठी 970 झाडू कामगार, 2106 गटार कामगार व 160 मजुरांची गरज आहे. याप्रमाणे सध्या काम करत असलेले 925 कामगार वगळून आणखी 2311 कामगारांची तातडीने गरज आहे .त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत 100 टक्के सफाईचे काम अशक्य असल्याचे सांगत या कर्मचार्‍यांनी प्रशासनाच्या अकलेची दिवाळखोरी जगजाहीर केलेली आहे. सरकारच्या परिपत्रकानुसार मक्तेदाराने कामगार उपलब्ध करुन द्यावेत म्हणून तशी सक्ती मक्तेदारांना का केली जात नाही, असाही प्रश्‍न या निवेदनात विचारण्यात आलेला आहे.

‘त्यांना’ पाच दिवसांचा अल्टीमेटम
दरम्यान, निलंबीत कर्मचार्‍यांनी उपमहापौर यांच्यासह आयुक्त जीवन सोनवणे यांची भेट घेतली. या भेटीत निलंबीत कर्मचार्‍यांनी आयुक्तांना पाच दिवसात साफसफाई करून देतो असे सांगितले. तसेच पाच दिवसांच्या समाधानकारक कामानंतर पुन्हा कामावर घ्यावे अशी विनंती या कर्मचार्‍यांनी आयुक्तांना केली. आयुक्त सोनवणे यांनी निलंबीत कर्मचार्‍यांची विनंती स्वीकारून त्यांना उत्तम काम करून दाखविण्याचे आवाहन केले. कर्मचार्‍यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. मात्र उपमहापौरांनी मध्यस्थी करुन तोडगा काढला.