महापालिकेतील प्रवीण आष्टीकर आणि दिलीप गावडे यांच्याकडे 18-20 विभागांचे काम

0

अतिरिक्त व सहाय्यक आयुक्तांसाठी शासनाकडे केली मागणी
काम पूर्ण करण्यासाठी होते कसरत

पिंपरी- पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये सध्या प्रभारी अतिरिक्त आयुक्त प्रवीण आष्टीकर आणि अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे यांच्याकडे सर्वात जास्त विभागांचा कारभार सोपविला आहे. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या वतीने प्रभारी अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे आणि प्रवीण आष्टीकर यांच्याकडे सुपरव्हायझरी चार्ज’ सोपवण्यात आला आहे. याशिवाय या दोन्ही अधिकार्‍यांकडे सहायक आयुक्त म्हणूनही काही विभागांची जबाबदारी सोपवली आहे. गावडे आणि आष्टीकर यांच्याकडे 18 ते 20 विभागांचा कारभार सोपविण्यात आला आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनात एक अतिरिक्त आयुक्त आणि दोन सहायक आयुक्त पदांची भरती करण्याबाबत राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवला आहे. मात्र, अद्याप शासनाची अनुमती मिळाली नाही. त्यामुळे हे दोघा अधिकार्‍यांवर जास्त ताण येत आहे.

 आष्टीकरांकडे 17 विभागांचा चार्ज
महापालिकेमध्ये प्रवीण आष्टीकर यांच्याकडे प्रशासन, भांडार आणि निवडणूक अशा तीन विभागांचा कारभार सहायक आयुक्त म्हणून सोपला आहे. यासह प्रभारी अतिरिक्त आयुक्त म्हणून अन्य 17 विभागांचा कारभार हा ‘सुपरव्हायझरी चार्ज’ पहावा लागत आहे. आयुक्तांच्या सूचनेनुसार या विभागांच्या कामकाजावर आष्टीकरांना नजर ठेवावी लागते. वास्तविक, आयुक्तांची भूमिका ही काम करुन घेण्याची असते. त्यामुळे अतिरिक्त आयुक्तांकडे सुपरव्हायझरी चार्ज’ दिले जातात. आयुक्तांचे अधिकार हे सुपरव्हायझरी चार्ज’ म्हणून अतिरिक्त आयुक्तांना विभागून दिले जातात. तर प्रभारी अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे यांच्याकडे स्वच्छ भारत अभियान, प्रॉपर्टी टॅक्स, अभिलेख, जनसंपर्क विभागाचा सहायक आयुक्त म्हणून कारभार पहावा लागतो. तसेच, आयुक्तांचे ‘सुपरव्हायझरी चार्ज’ म्हणून सुमारे 16 ते 17 विभागांचा कारभार सांभाळत आहेत. आयुक्तांच्यावतीने या विभागांच्या फाईल अतिरिक्त आयुक्त तपासणी करीत असतात. त्यानंतर पुन्हा त्याची स्क्रुटनी करुन त्या आयुक्तांकडे स्वाक्षरीसाठी पाठवल्या जातात.

झगडे आणि खोराटे यांच्याकडेही 3 विभाग
संपूर्ण महत्वाचा कारभार या खात्यांमध्ये येत असतो. त्यामुळे या दोन्ही अधिकार्‍यांच्या टेबलांवर मोठ्या प्रमाणात फाईल येत असतात. यामध्ये नगरसेवकांच्या, नेत्यांच्या तसेच नागरिकांच्या तक्रारींचा किंवा सूचनांचा समावेश असतो. त्यामुळे ही कामे लवकर मार्गी लावण्यासाठी त्यांना खूप कसरत करावी लागते. महापालिका आयुक्त आणि संबंधित विभागातील दुवा म्हणून काम करावे लागते. त्याचा ताण दैनंदिन कामकाजावर होत असतो. यासह सहायक आयुक्त स्मीता झगडे आणि विजय खोराटे यांच्याकडेही तीन-तीन विभागांचा कारभार आहे.

अंतिम निर्णय या अधिकार्‍यांचा
पिंपरी-चिंचवड महापालिकेत प्रभारी अतिरिक्त आयुक्त प्रवीण आष्टीकर आणि दिलीप गावडे यांच्यावर सत्ताधारी भाजपच्या नेत्यांनी कृपादृष्टी दाखवली आहे. त्यांना एकेक करीत तब्बल 18 ते 20 विभागांचा कारभाराचे नियंत्रण दिले आहे. याखेरीज, बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांच्याकडील आर्थिक अधिकार काढून ते प्रवीण आष्टीकरांना देण्याचा निर्णय घेण्यात आला. या सर्व विभागातील अंतिम निर्णय तेच घेणार आहेत. आयुक्तांचे अधिकार दोन्ही अतिरिक्त आयुक्तांकडे विभागून दिल्यामुळे दोन्ही अधिकार्‍यांच्या स्वाक्षरीशिवाय कोणतीही फाईल आयुक्तांच्या समोर जात नाही. त्यामुळे महापालिकेतील हे दोन्ही अधिकारी सध्या सर्वाधिक ताकदवान झाले आहेत.

महापालिकेमधील प्रशासन, भांडार आणि निवडणूक अशा तीन विभागांचा कारभार सहायक आयुक्त म्हणून काम करीत आहे. तसेच, अतिरिक्त आयुक्त म्हणूनही जबाबदारी आहे. महापालिका आयुक्त आणि संबंधित विभागून दिलेल्या विभागांच्या सहायक आयुक्तांमधील दुवा म्हणून ‘सुपरव्हायझरी चार्ज’ अतिरिक्त आयुक्तांकडे असतो. योग्य नियोजनामुळे सध्या कामाचा तसा ताण नाही. पण, माझ्या टेबलावरील शंभर टक्के फाईल मी पूर्ण केल्या आहेत.
– प्रवीण आष्टीकर, प्रभारी अतिरिक्त आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका