विरोधी पक्षनेते दत्ता साने यांचा सणसणाटी आरोप
सुरक्षेबाबत आयुक्तांची भूमिका बोटचेपी?
पिंपरी-चिंचवड : महापालिकेतील महिला कर्मचारी असुरक्षित आहेत. एका महिलेला सेवा पुस्तकात अनुकूल गोपनीय अहवाल लिहिण्यासाठी एका उच्चपदस्थ अधिकार्याने त्रास दिला होता. यासंदर्भात वरिष्ठांकडे तक्रार केली असता हे प्रकरण दडपले आहे, असा सणसणाटी आरोप विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केला आहे. तसेच याप्रकरणात आयुक्तांनी देखील बोटचेपी भूमिका घेतली असल्याचा दावा केला आहे.
विशाखा समिती काय कामाची?
याबाबतच्या पत्रकात साने यांनी म्हटले आहे की, यापूर्वी देखील एका कार्यकारी अभियंत्याने सहकारी महिलेशी गैरवर्तन केले होते. याप्रकरणात खातेनिहाय चौकशी होऊन या अभियंत्यावर कारवाई करण्यात आली आहे. तरी, देखील पालिकेत वरिष्ठ अधिका-यांकडून महिलांना त्रास देण्याचे प्रकार सुरुच आहेत. महिलांवर अन्यायासाठी पालिकेत कार्यरत असलेली विशाखा समितीकडूनही महिलांना योग्य सहकार्य मिळत नाही. अनुकूल गोपनीय अहवाल लिहिण्यासाठी एका उच्चपदस्थ अधिकार्याने महिलेला त्रास दिला होता. संबंधित महिलेने याप्रकरणी वरिष्ठांकडे लेखी तक्रार देखील केली होती. परंतु, हे प्रकरण ’रफादफा’ करण्यात आले.
महिलांचे मनोबल खचले
आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करणे गरजेचे होते. परंतु, या प्रकरणात त्यांनी गुळमूळीत भूमिका घेतली. त्यामुळे या प्रकरणाचे आयुक्तांना गांभीर्य नसल्याचे दिसून येते. यामुळे महिला कर्मचार्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रकरण दडपल्याने आणि संबंधितांवर काहीच कारवाई झाली नसल्यामुळे सर्वच महिलांचे मनोबल खचले आहे, असेही साने यांनी म्हटले आहे.