महापालिकेत अधिकारी-कर्मचार्‍यांची सुमारे अडीच हजार पदे रिक्त!

0

पिंपरी-चिंचवड : महापालिकेत वर्ग एक ते चार या संवर्गातील जवळपास अडीच हजार पदे रिक्त असून, त्याचा दैनंदिन कामकाजावर परिणाम होत आहे. पुरेशा मनुष्यबळाअभावी कामे प्रलंबित राहत आहेत. सध्या असलेल्या अधिकारी व कर्मचार्‍यांवर कामाचा प्रचंड ताण येत आहे. त्यामुळे शासनाने ही रिक्त पदे त्वरित भरण्याची गरज आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका आस्थापनेवर शासनाकडून एकूण नऊ हजार 764 पदे मंजूर आहेत. परंतु, त्यापैकी सध्या सात हजार 183 पदांवर अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. म्हणजेच, जवळपास दोन हजार 581 पदे रिक्त असून, महापालिकेतील सर्वच विभागांवर कामाचा अतिरिक्त ताण येत आहे.

श्रीकर परदेशींच्या काळात भरती प्रक्रिया
रिक्त पदांमुळे कामात येणार्‍या अडचणी लक्षात घेऊन तत्कालीन आयुक्त व सध्या पंतप्रधान कार्यालयाचे सचिव असणारे श्रीकर परदेशी यांनी प्रशासन अधिकारी पदासाठी परीक्षा घेऊन भरती प्रक्रिया राबविली होती. या प्रक्रियेत प्रशासन अधिकार्‍यांची निवड झाल्याने कामकाजात सुसूत्रता आली होती. मात्र, त्यानंतर रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया झालेली नाही. रिक्त पदांमुळे दैनंदिन कामात अनेक अडचणी येत आहेत. एकाच अधिकार्‍याकडे प्रमुख जबाबदारीसह अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे कामाला न्याय देता येत नसल्याची तक्रार आहे.

कार्यक्षेत्र वाढले; पदे रिक्तच
पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या दिवसागणिक वाढत आहे. नगरपालिका असलेल्या पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या 1981 मधील जनगणनेनुसार 2 लाख 49 हजार 364 एवढी होती. त्यानंतर 11 ऑक्टोबर 1982 रोजी पिंपरी-चिंचवड नगरपालिकेचे महापालिकेत रुपांतर करण्यात आले. त्यानुसार महापालिकेत गट अ- 85, गट ब- 208, गट क- 2987 तर गट ड- 4181 अशी एकूण 7 हजार 461 एवढी अधिकारी व कर्मचार्‍यांची पदे डिसेंबर 2015 अखेर कार्यरत होते. मात्र, महापालिकेत अतिरिक्त 18 गावांचा समावेश झाल्याने महापालिकेचे कार्यक्षेत्र वाढले. मिळकतींची संख्याही प्रचंड वाढली. त्यामुळे अधिकारी व कर्मचार्‍यांवर कामाचा ताण येत आहे. तरीही महापालिकेत सरळसेवेने कर्मचारी भरती झालेली नाही.

अतिरिक्त कामाचा वैताग
पिंपरी-चिंचवड महापालिका आस्थापनेवर शासनाकडून मंजूर असलेल्या गट अ- 220, गट ब- 269, गट क- 3890, गट ड इतर- 2792, ड सफाई संवर्ग- 2593 ही वर्ग एक ते वर्ग चार अशी एकूण 9 हजार 764 पदे मंजूर आहेत. मात्र, सध्या महापालिकेत गट अ- 81, गट ब- 220, गट क- 2865, गट ड इतर- 2098 आणि ड सफाई संवर्ग- 1919 अशी एकूण 7,183 पदे भरलेली आहेत. उपलब्ध असलेल्या अधिकारी व कर्मचार्‍यांकडूनच अतिरिक्त काम करून घेतली जात आहेत. अधिकारी व कर्मचारी कामाच्या त्रासाने वैतागले असून, अनेकांनी स्वेच्छा निवृत्तीचा पर्याय अवलंबला आहे.