महापालिकेत अभियांत्रिकी पदाच्या पदोन्नती रखडल्या

0

पिंपरी ः पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अभियांत्रिकी विभागाच्या अधिका-यांच्या पदोन्नती रखडल्या आहेत. खुल्या प्रवर्गातून 24 जणांच्या पदोन्नतीबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. गेल्या दोन महिन्यापासून पालिका डीपीसी समितीच्या बैठका न झाल्याने अभियांत्रिकी विभागातून नाराजी व्यक्त होत आहे. याबाबत महापालिका आयुक्तांना वेळ मिळेना झाल्याने समितीची तारीख पे तारीख सुरु आहे. महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील वर्ग एक ते चार मधील अधिकारी व कर्मचार्‍यांना पदोन्नती देण्यासाठी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली डीपीसी समिती कार्यरत आहे.

पदोन्नती समितीत 24 जणांचे प्रस्ताव…
या समितीत आयुक्त, प्रशासन विभागाचे अतिरिक्त आयुक्त, सहायक आयुक्त, मुख्य लेखाधिकारी, मुख्य लेखा परिक्षक, मागासवर्गीय प्रतिनिधींचा समावेश असतो. त्या समितीची बैठक वारंवार पुढे ढकलली जात आहे. महापालिकेच्या अभियांत्रिकी विभागातून कनिष्ठ अभियंता, उपअभियंता, कार्यकारी अभियंता, सहशहर अभियंता आणि शहर अभियंता पदाबाबत खुल्या प्रवर्गातून पदोन्नती देण्यासाठी पालिकेच्या पदोन्नती समितीत 24 जणांचे प्रस्ताव प्रशासनाने दाखल केले आहे. महापालिकेतील मंजूर असलेल्या रिक्त पदावर तात्काळ पदोन्नती देण्यात यावी, अशी मागणी अभियंता वर्गातून सतत होत आहे. त्यानूसार प्रशासन विभागाने हे 24 जणांचे प्रस्ताव तयार केलेले आहेत.

पदोन्नतीबाबत त्रूटी..

परंतू, समितीतील काही सदस्यांना अभियंत्याना पदोन्नती देण्याबाबत त्रूटी काढल्या आहेत. त्या त्रूटीची पुर्तता प्रशासन विभागाकडून केलेली आहे.अभियांत्रिकी विभागातील कनिष्ठ ते शहर अभियंता पदापर्यंत 24 जणांना पदोन्नती देण्यासाठी डीपीसी समितीपुढे प्रस्ताव ठेवूनही त्याकडे समिती सदस्यांचे लक्ष दिलेले नाही. मुळात समिती अध्यक्ष म्हणून आयुक्तांनाच बैठक घेण्यास वेळ नसल्याने वारंवार ही बैठक पुढे ढकलली जात आहे.