महापालिकेत आज ‘स्मार्ट सिटी’ची बैठक

0

पिंपरी-चिंचवड : स्मार्ट सिटी लिमिटेड या विशेष उद्देश वाहन (स्पेशल पर्पज व्हेइकल) कंपनीच्या नवनियुक्त संचालक मंडळाच्या पहिल्या सभेला आता शुक्रवारचा (दि.18) मुहुर्त मिळाला आहे. स्मार्ट सिटीच्या अध्यक्षांना वेळ नसल्याने मागील शनिवारी (दि.12) होणारी सभा ऐनवेळी रद्द करण्यात आली होती.
पालिका मुख्यालयात आता ही सभा होईल.

ऐनवेळी सभा झाली होती रद्द
एसपीव्हीची स्थापना करण्यात आली. तसेच प्रशासनाकडून पॅनसिटी, एरिया बेस डेव्हलपमेंटचे नियोजन करण्यात आले. कंपनी स्थापनेनंतर पहिली बैठक, सभा महापालिकेतील मुख्य भवनात शनिवारी (दि.12) सकाळी अकरा वाजता होणार होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. नितीन करीर असणार होते. मात्र, त्यांना वेळ नसल्यामुळे ऐनवेळी सभा रद्द करावी लागली होती. आता या सभेला शुक्रवारचा मुहुर्त मिळाला आहे.

विविध प्रस्तावांवर चर्चा
नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. नितीन करीर यांच्या अध्यक्षतेखाली होणार्‍या सभेत वैधानिक प्रस्तावावर चर्चा होईल. त्यात प्रामुख्याने स्वाक्षरीचे अधिकार बहाल करणे, शिक्क्याला मंजुरी देणे. कार्यालयीन पत्ता अधिकृत करणे, कंपनी सचिव, कंपनी चार्टट अकाऊंटची (सीए) नेमणुक करणे, एरिया बेस डेव्हलपमेंट आणि पॅनसिटी प्रकल्पासाठी सल्लागार नेमणे या प्रमुख प्रस्तावांचा समावेश आहे. याशिवाय शिवसेनेचे नगरसेवक प्रमोद कुटे आणि मनसेचे सचिन चिखले यांचा संचालक मंडळात समावेश करणे, या विषयाचाही समावेश आहे.

यांची असेल उपस्थिती
संचालक मंडळामध्ये महापौर नितीन काळजे, सभागृह नेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते योगेश बहल, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, पीएमपीएमएलचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांच्यासह केंद्रिय गृहनिर्माण विभागाचे सहसचिव आर.एस.सिंग यांचा समावेश आहे.