महापालिकेत उंदीर घोटाळा!

0

पिंपरी-चिंचवड : महापालिकेच्या निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालयातील सापांसाठी हापकीन ही संस्था 75 पैसे या दराने उंदीर देण्यास तयार आहे. मात्र, पालिका प्रशासन जीबी एन्टरप्रायझेस या खासगी संस्थेकडून 138 रुपयाला एक उंदीर कशासाठी खरेदी करते? असा सवाल पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संजोग वाघेरे यांनी उपस्थित केला आहे. तसेच या सर्व प्रकारामध्ये संबंधितांनी लाखो रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप करत आयुक्तांनी प्राणी संग्रहालयातील अनागोंदी कारभाराची सखोल चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली.

लाखो रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप
प्राणी संग्रहालयातील सापांसाठी खाद्य म्हणून पालिकेतर्फे उंदीरांची खरेदी केली जाते. शहरातीलच हाफकिन ही संस्था एक उंदीर 75 पैशात देण्यासाठी तयार असताना जीबी एन्टरप्रायझेस या खासगी संस्थेकडून तब्बल 138 रुपयाला एक उंदीर खरेदी करण्यात येत आहे. यामध्ये लाखो रुपयांचा घोटाळा होत असल्याचा आरोप त्यांनी केली. याशिवाय बहिणाबाई प्राणी संग्रहालयात पालिकेने अद्यापही सीसीटीव्ही कॅमेरे बसविले नाहीत. त्यामुळे येथील अजगर, मगरीची पिल्ले, मांडूळ यासारख्या प्राण्यांची चोरी झाली आहे.यासारख्या घटना थांबविण्यासाठी सुरक्षारक्षकांची, सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची गरज असताना इतर गोष्टींवर लाखो रुपयांची उधळपट्टी करण्यात येत आहे. पालिकेने प्राणी संग्रहालयाताल नियम पायदळी तुडवत एका कर्मचार्‍याला संग्रहालयाच्या आवारातच राहण्यासाठी घर उपलब्ध करुन दिले आहे. याविषयी अधिक माहिती देण्यास संबंधित उद्यानातील अधिकारी टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे वरील प्रकरणाची तत्काळ चौकशी करुन संबंधित दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी वाघेरे यांनी आयुक्तांकडे केली आहे.