महापालिकेत गिरवले जात आहेत जीएसटीचे धडे

0

विरार – देशातील करप्रणालीत एकसूत्रता आणून सुधारणा आणणारी जीएसटी करप्रणालीची 1 जुलैपासून अंमलबजावणी सुरू झाली. परंतु, सध्या जीएसटी म्हणजे काय रे भाऊ?, असाच प्रश्न सर्वांना पडला आहे. जीएसटीबाबत सर्वत्र संभ्रामाचे वातावरण पाहायला मिळत आहे. यासाठी कार्यालयामध्ये जीएसटीचे प्रशिक्षण आणि मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात येत आहे. यावेळी महापालिकेमध्येही जीएसटीचे धडे देण्यात येत आहेत. महापालिकेमध्ये जीएसटीची नेमकी भूमिका कशी असते?, हे समजवण्यासाठी प्रशिक्षणवर्ग भरवण्यात येत आहेत. यावेळी अधिकारी व कर्मचारी जीएसटीचे धडे गिरवत आहेत.

मिरा भाईंदर महापालिकेत नुकतेच जीएसटी करप्रणालीच्या पार्श्वभूमीवर प्रशिक्षण शिबीराचा पहिला टप्पा पार पडला. यावेळी एएमएन असोसिएट चार्टड अकाऊंटट अनिल मानसिंहका यांनी महापालिकेतील अधिकार्यांना मार्गदर्शन करत असाईनमेंट दिले आहे. पुढील टप्प्यातील शिबीरात अधिकार्यांना सादर केलेल्या असाईनमेंटवर मार्गदर्शन करण्यात येत आहे. त्यामुळे सध्या मिरा भाईंदर महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारीवर्ग जीएसटी करप्रणालीचा अभ्यास करत आहेत. तर, दुसरीकडे वसई विरार महापालिकेतील अधिकार्यांसाठीही जीएसटीचा अभ्यास लवकरच सुरू होणार आहे. वसई विरार महापालिकेतील अधिकारी व कर्मचार्यांसाठी पुढील दोन आठवड्यांत जीएसटी करप्रणालीवर प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेचे मुख्य लेखापरीक्षक प्रकाश कुळेकर यांनी दिली. सध्या विभाग प्रमुखांनी त्यांच्या विभागातील कामांचा आढाव घेऊन त्यानुसार त्यांचे जीएसटी करसाठी असलेले प्रश्न तयार करून सादर करण्यास सांगितले असल्याची माहितीही प्रकाश कुळेकर यांनी यावेळी दिली. यावरुन वसई विरार महापालिकेतील अधिकार्यांचा जीएसटी करप्रणालीचा पूर्व अभ्यासास सुरुवात झाली आहे.

पूर्व अभ्यासास सुरूवात
वसई विरार महापालिका लवकरच आपल्या अधिकार्यांसाठी जीएसटी करप्रणालीवर प्रशिक्षण शिबिर आयोजन करणार असल्याची माहिती मुख्य लेखापरीक्षक प्रकाश कुळेकर यांनी दिली. याबाबत भारतीय महसूल सेवा (आयआरएस) आयकर, सीमा आणि केंद्रीय शुल्क अधिकारी विनय कुमार यांची बुधवारी भेट घेतली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. अधिकार्यांनी आपल्या विभागाच्या कामानुसार, जीएसटी संबंधित असलेले त्यांचे प्रश्न सादर करण्याच्या सूचना विनय कुमार यांनी यावेळी दिल्याचेही त्यांनी सांगितले. त्यानुसार, अधिकारी कामाला लागले असून गुरूवारपासून जीएसटीबाबतचा त्यांचा पूर्व अभ्यासही सुरू झाला आहे.

जीएसटी करप्रणालीत महापालिकेचाही समावेश झाला आहे. महापालिकेच्या सुविधाही जीएसटीच्या अंतर्गत येत आहेत. या पार्श्वभूमीवर भारतीय महसूल सेवा (आयआरएस) आयकर, सीमा आणि केंद्रीय शुल्क अधिकारी विनय कुमार हे वसई विरार महापालिकेच्या अधिकार्यांना मार्गदर्शन करणार आहेत. यासाठी त्यांचा वेळ आम्ही घेतला आहे. पुढील आठवड्यात या शिबीराला सुरूवात होईल. या शिबीराची तारीख आणि वेळ लवकरच ठरवण्यात येईल. आवश्यकतेनुसार दोन ते तीन टप्प्यात हे शिबीर घेण्यात येईल. सध्या महापालिकेच्या अधिकार्यांना याबाबतीत सूचना देण्यात आल्या आहेत.
– प्रकाश कुळेकर,
मुख्य लेखापरीक्षक