महापालिकेत ठेकेदारांना पुन्हा विभागून काम; कामगार पुरविण्यासाठी स्थायीपुढे प्रस्ताव

0

काळजीवाहक, रखवालदार, माळी एकूण 108 कामगार पुरविणार; 9कोटी 24 लाखांचे काम

पिंपरी । पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत ठेकेदारांना पुन्हा विभागून काम देण्यात येणार आहे. शहरातील स्मशानभूमीमधील दैनंदिन स्वच्छता साफसफाई देखरेख सुरक्षा व उद्यान कामाकरिता ठेकेदार पध्दतीने कामगार पुरविण्यात येणार आहे. सदरील कामात एकूण 108 कामगार पुरविण्यास तीन वर्षात तब्बल 18 कोटी 48 लाख 6 हजार 696 रुपये खर्च करण्यात येणार आहे. केवळ दोन्ही ठेकेदारांना प्राप्त झालेले लघुत्तम दर समान आल्याने हे काम आठ प्रभागातून विभागून दिले गेले आहे.

महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील स्मशानभूमीमधील दैनंदिन स्वच्छता साफसफाई देखरेख सुरक्षा व उद्यान आदी कामाकरिता ठेकेदार पध्दतीने कामगार पुरविणेत निविदा मागविण्यात आल्या होत्या. या कामास एकूण 9 निविदा प्राप्त झाल्या असून 9 निविदा पात्र झाल्या आहेत. त्यात दोन ठेकेदारांच्या निविदाधारक लुघत्तम समान दराचे प्राप्त झाले. त्या निविदेच्या कामात काळजीवाहक 48, रखवालदार 48, माळी 12 असे एकूण 108 कामगार पुरविणेत येणार आहे. त्या निविदेसाठी मे. जयभवानी इंटरप्रायजेस व अन्य एका ठेकेदाराचा -9.19 टक्के कमी असा समान दर प्राप्त झालेला आहे. दोन्ही निविदाधारकांनी समान दर सादर केल्याने प्रशासकीय कामकाजाच्या दृष्टीने सदरचे काम दोन्ही संस्थांना वाटप केले आहे.

सदरील काम तीन वर्षे कालावधीसाठी प्रत्येकी काळजीवाहक 24, रखवालदार 24, माळी 6 असे एकुण 54 कामगार पुरविण्यास ठेकेदार म्हणून नेमणूक करण्यात येणार आहे. याकामी त्यांच्याशी आवश्यक अटी व शर्थींचा करारनामा करणे, कामाचा आदेश देणे, कामगारांना किमान वेतन दराने देय वेतन व शासनाने किमान वेतन दराच्या विशेष भत्त्यात वाढ केल्यास अदा करावयाच्या प्रत्यक्ष खर्चास महापालिका अधिनियम 73(क) नुसार स्थायी समिती सभेपुढे मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे.