सत्ताधारी भाजपकडून राष्ट्रवादीची ओळख पुसण्याचा प्रयत्न
पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्तांतर होताच ‘नवा गडी, नवे राज्य’ या नियमानुसार अनेक बदल पाहण्यास मिळत आहेत. महापालिकेत भाजपची सत्ता येताच, महापौर कक्षातील राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, दिवंगत माजी शालेय शिक्षणमंत्री प्रा. रामकृष्ण मोरे यांचे फोटो काढून टाकण्यात आले असून, या फोटोंच्या जागी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची छबी झळकत आहे.
भाजपचे निर्विवाद वर्चस्व
पिंपरी-चिंचवड महापालिकेत याआधी राष्ट्रवादीची सत्ता होती; मात्र नुकत्याच झालेल्या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत सत्तांतर झाले. 128 पैकी 77 जागा जिंकून भाजपने निर्विवाद बहुमत मिळविले. आता महापालिकेतील राष्ट्रवादीची ओळख पुसून टाकण्याचा प्रयत्न सत्ताधारी भाजप करीत आहे. त्यातूनच महापौर कक्षात राष्ट्रवादीची सत्ता असताना लावण्यात आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, दिवंगत माजी शालेय शिक्षणमंत्री प्रा. रामकृष्ण मोरे यांचे फोटो काढून टाकण्यात आले आहेत.
महापालिका वर्तुळात जोरदार चर्चा
भाजपच्या पदाधिकार्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच दिवंगत माजी शालेय शिक्षणमंत्री प्रा. रामकृष्ण मोरे यांच्या फोटोंच्या जागी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो लावले आहेत. त्या फोटो शेजारीच ‘नई सोच नई उम्मीद, सबका साथ सबका विकास’, ‘या आपण सारे मिळून करू या शहराबरोबरच राज्य आणि देशाचा विकास,’ असे लिहिले आहे. त्याची जोरदार चर्चा महापालिका वर्तुळात होत आहे.