पुणे । भारतीय जनता पक्षाचा महापालिकेतील एक वर्षांचा कारभार म्हणजे फसव्या घोषणांचीच वर्षपूर्ती झाली असे म्हणावे लागेल. त्यांनी ज्या घोषणा केल्या त्यातील वर्षभरात काही झाले नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षा वंदना चव्हाण यांनी केली. महापालिकेत भाजपची सत्ता येऊन एक वर्ष झाले आहे. त्यानिमित्त चव्हाण यांनी त्यांच्या भाजपवर टीका केली आहे.
पीएमपीची बस खरेदी, महिला, कामगार, आर्थिक दुर्बल घटक वर्ग यांच्यासाठी 50 मार्गांवर मोफत बस प्रवास, दोन बीआरटी मार्गांवर पुणेकरांना मोफत प्रवास, बस खरेदीसाठी केंद्र आणि राज्य सरकारचा निधी आणणार, विकास आराखड्यीाच अंमलबजावणी करणार, शहरात सर्वत्र पुरेसे आणि पुरेशा दाबाने 24 तास पाणी पुरवठा करणार, रिंग रोडचे काम पूर्ण करणार, स्मार्ट सिटीच्या प्रकल्पांना गती देणार, नदी सुधारणेच्या प्रकल्पात लोकसहभाग घेणार, प्रत्येक प्रभागात कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारणार आदी अनेक घोषणा भाजपने केल्या होत्या. परंतु, वर्षभरात यातील काहीही झालेले नाही.
स्मार्ट सिटीच्या 14 सल्लागार गायब
स्मार्ट सिटींतर्गत प्रकल्पांची घोषणा करण्यात आली होती. त्यातील 14 प्रकल्पांचे भूमिपूजन पंतप्रधान मोदी यांनी केले होते. परंतु त्यातील मोफत वाय-फाय, प्लेसमेकींग, डिजिटल डिस्प्ले बोर्ड, सायकल शेअरींग, लाईट हाऊस आदी पाच प्रकल्पच सुरू आहेत. संपूर्ण शहरासाठी ई-बस, एटीएमएस, ओपन डेटा, स्मार्ट एलिमेंट, रोड ऍसेट मॅनेजमेंट, स्ट्रीट लाईटनिंग, ट्रान्झिट हब, आयटी सेन्सर्स, स्मार्ट पार्किंग, इनोव्हेशन हब, ई- रिक्षा, स्मार्ट ग्रीड आदी अनेक प्रकल्प रखडले आहेत. स्मार्ट सिटीच्या 16 पैकी 14 सल्लागार फिरकत नसल्यामुळे त्यांचे पैसे थांबविण्याची वेळ स्मार्ट सिटी कंपनीवर आली होती, असे उघड झाले आहे. भाजपचेच पालकमंत्री, आमदार स्मार्ट सिटीच्या कामावर नाराज असल्याचे वारंवार उघड झाल्याची टीका चव्हाण यांनी केली आहे.
भाजपच्या पदाधिकार्यांच्या कामाचे वाभाडे
कात्रज-कोंढवा रस्ता, एटीएमएस, समान पाणी पुरवठा या प्रकल्पांतील गैरव्यवहारांमुळे त्यांच्या फेरनिविदा मागवाव्या लागल्या. मित्रमंडळ चौकातील महापालिकेचा भूखंड भाजपशी संबंधित घटक गिळंकृत करू पाहत आहेत. पक्षाच्या महापालिकेतील तक्रारींमुळे तुकाराम मुंढे, प्रेरणा देशभ्रतार यांच्यासारख्या अधिकार्यांच्या बदल्या झाल्या आहेत. भाजपमधील अस्वस्थ घटकांनी दोन निनावी पत्रांद्वारे भाजपच्या पदाधिकार्यांच्या कामाचे वाभाडे काढले आहे. त्यामुळे भाजपची महापालिकेत वर्षपूर्ती ही केवळ फसव्या घोषणांची वर्षपूर्ती ठरली आहे असेही चव्हाण यांनी म्हटले आहे.
गेली दोन वर्षे वाढीव दराने पाणीपट्टी देत असतानाही शहराच्या मध्यभागात आणि उपनगरांत पाणी पुरवठ्याची समस्या कायम आहे. विकेंद्रीत कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचे नियोजन अजूनही झालेले नाही. प्रत्येक प्रभागात एक प्रकल्प उभारण्याची घोषणा कशी फसवी होती, हेच दिसून येत आहे. राष्ट्रवादी सत्तेत असताना विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक, अपंग आणि गरजू विद्यार्थी यांच्यासाठी माता रमाई आंबेडकर योजना’,माता जिजाऊ योजना’. शरद स्वावलंबी योजना’ आणि डॉ. बाबा आमटे योजना’ या योजना सुरू केल्या होत्या.