पुणे : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या पुणे महापालिकेत 162 पैकी 98 जागा जिंकत भारतीय जनता पक्षाने इतिहास घडवला. निर्विवाद बहुमत मिळवत महापालिकेत स्वबळावर सत्ता स्थापन करण्याचे स्वप्न भाजपने खरे करून दाखवले असून, महापौर भाजपचाच होणार हेही स्पष्ट झाले आहे. महापालिकेतील सत्तारूढ राष्ट्रवादी काँग्रेसला अवघ्या 29 जागांवर समाधान मानावे लागले असून, या निवडणुकीत काँग्रेस, शिवसेना व महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे पक्ष भुईसपाट झाले. एमआयएमने या निवडणुकीत प्रथमच खाते उघडले.
शहरात भाजपला 98, राष्ट्रवादीला 38, शिवसेनेला 10, तर काँग्रेसला अवघ्या 9 जागांवर समाधान मानावे लागले, तर मनसेचे साईनाथ बाबर व वसंत मोरे हे दोन उमेदवार निवडून आले. तसेच, 4 जागांवर अपक्षांनी विजय मिळवला. एमआयएमच्या अश्विनी लांडगे या प्रभाग 6, येरवडा येथून विजयी झाल्या. त्यांच्या विजयामुळे एमआयएमने शहरात प्रथमच खाते उघडले आहे. प्रभाग 15 मधील भाजपच्या उमेदवार मुक्ता टिळक विक्रमी मतांनी विजयी झाल्या. महापालिकेतील पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षा वंदना चव्हाण यांनी संध्याकाळी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
या निवडणुकीत महापालिकेतील अनेक दिग्गज नगरसेवकांना पराभवाला सामोरे जावे लागले. शहरात भाजपची लाट असूनही पक्षाचे गटनेते गणेश बिडकर पराभूत झाले. विद्यमान उपमहापौर मुकारी अलगुडे, स्थायी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके, सभागृह नेते बंडु केमसे, माजी सभागृह नेते सुभाष जगताप, माजी महापौर कमल व्यवहारे व राजलक्ष्मी भोसले, मनसेचे नगरसवेक बाबु वागस्कर, रुपाली पाटील, शिवसेनेचे शहर प्रमुख विनायक निम्हण यांचे चिरंजीव सनी निम्हण आदी वजनदार उमेदवार पराभूत झाले.
महापौर प्रशांत जगताप व त्यांच्या मातौश्री रत्नप्रभा जगताप, आमदार योगेश टिळेकर यांच्या मातोश्री रंजना टिळेकर, माजी महापौर दत्ता धनकवडे, चंचला कोद्रे व वैशाली बनकर, माजी उपमहापौर आबा बागुल, दीपक मानकर, खासदार अनिल शिरोळे यांचे चिरंजीव सिद्धार्थ शिरोळे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बापू कर्णे गुरूजी, भाजप पुरस्कृत रेश्मा भोसले या चर्चेतील उमेदवारांनी विजय मिळवला.
भाजपने शहरात अन्य पक्षांतून नगरसेवक व कार्यकर्ते आयात केले होते. त्यांपैकी अनेकांना भाजपने उमेदवारीही दिली होती. त्यात प्रामुख्याने शंकर पवार, राजाभाऊ लायगुडेे, पिट्या धावडेची पत्नी रुपाली धावडे, बंडू ढोरे, विजय शेवाळे, प्रसन्न जगताप, ज्योती गोसावी आदी उमेदवार विजयी झाले. या निवडणुकीत शंभरावर नगरसेवक पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यातील निम्म्याहून अधिक नगरसेवक पराभूत झाले.
शहरातील 22 केंद्रांवर सकाळी दहाला मतमोजणी सुरू झाली. त्यावेळी दुपारी तीन ते चारपर्यंत सर्व निकाल लागतील, अशी अपेक्षा होती. मात्र, संथगतीने मतमोजणी सुरू राहिल्याने निकाल लागण्यास विलंब होत होता. रात्री उशिरापर्यंत मतमोजणी सुरू होती. मतमोजणी केंद्रांबाहेर उमेदवारांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. प्रत्येक फेरीच्या घोषणेनंतर समर्थक जल्लोष करत होते. विजयी उमेदवाराची घोषणा झाल्यानंतर त्यांचे समर्थक गुलाल उधळून आनंद साजरा करत होते.
निवडणुकीचे निकाल जसजसे जाहीर होत होते, तसतसे शहरातील वातावणर अधिक जल्लोषपूर्ण बनत होते. भाजपच्या कार्यकर्त्यांनी शहरभर जल्लोष केला. भाजपच्या सन्मान हॉटेलसमोरही कार्यकर्त्यांनी मोठ जल्लोष केला. दुसरीकडे काँग्रेस भवनात शुकशुकाट होता, तशीच स्थिती शिवसेना व राष्ट्रवादीच्या कार्यालयातही होती.