महापालिकेने केले पुरनियंत्रण रेषा कायद्याचे उल्लंघन?

0

पिंपरीतील संजयनगर झोपडपट्टी शेजारील नदी पात्रात होतेय मैलाशुध्दीकरण केंद्र
रिपब्लिकन युवा मोर्चाच्यावतीने जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार

पिंपरी-चिंचवड : पिंपरीतील संजयनगर झोपडपट्टी शेजारील पवना नदीच्या पात्रात महापालिकेच्या ड्रेनेज विभागाकडून मैलाशुध्दीकरण प्रकल्पाचे बांधकाम सुरु आहे. याविषयी महापालिकेच्या अधिकारी आणि संबंधित ठेकेदारांनी जिल्हाधिका-याकडून कोणतीही परवानगी न घेता मैलाशुध्दीकरण प्रकल्पाचे बांधकाम करीत पुरनियंत्रण रेषेचे उल्लंघन करुन पर्यावरणाची हानी केली आहे. त्यामुळे संबंधित अधिकारी, ठेकेदारांवर कारवाई करुन मैलाशुध्दीकरणाचे बांधकाम थांबवावे, अशी मागणी रिपब्लिकन युवा मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याकडे केली आहे.

ड्रेनेज अधिकार्‍यांचे पहा धाडस
शहरातून वाहणार्‍या पवना नदी पात्रालगत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होवू लागले आहेत. त्यावर महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांचे कसलेही नियंत्रण राहिलेले नाही. नदी पात्रालगत शहरात नागरिकांकडून अनधिकृत बांधकामे, अतिक्रमण वाढत असताना त्यावर महापालिकेच्या अनधिकृत बांधकाम नियंत्रण पथकाद्वारे कारवाईकडे डोळेझाक होत आहे. अनेकांनी पुरनियंत्रण रेषेचे उल्लंघन केले, तसेच पर्यावरणाची हानी देखील करत आहेत. त्यातच आता महापालिकेच्या ड्रेनेज विभागातील अधिकारी देखील कोणाची भिती न बाळगता धाडस करुन थेट नदी पात्रात मैलाशुध्दीकरणाचे बांधकाम करीत आहेत.

पर्यावरणाची परवानगीच नाही
पिंपरीगावातील वॅार्ड क्रमांक 45 मधील संजय गांधी नगर झोपडपट्टीमध्ये मैला शुध्दीकरण केंद्र उभारले जात आहे. परंतू अधिकार्‍यांनी हे केंद्र बांधण्यासाठी नकाशा दर्शेविल्याप्रमाणे ठेकेदाराला जागा उपलब्ध करुन दिलेली नाही. त्यामुळे ठेकेदाराने थेट नदीत बांधकामाला सुरुवात केलेली आहे. हे बांधकाम नदी पात्रात सुरु करताना पुरनियंत्रण रेषेचे उल्लंघन झाले असताना त्यावर अधिकारी बोलण्यास टाळत आहेत. तसेच बांधकाम करताना पर्यावरणाची कोणतीही परवानगी घेतलेली नाही. केवळ अधिकार्‍यांच्या मदतीने ठेकेदारांने हे मैलाशुध्दीकरणाचे काम सुरु ठेवले आहे.

आयुक्तांनी केले साफ दुर्लक्ष
दरम्यान, नदी पात्रात मैलाशुध्दीकरण केंद्र उभारण्यात येवू लागल्याने रिपब्लिकन युवा मोर्चाच्या वतीने महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देवून सदरील कामाची चौकशी करण्याची मागणी केली. परंतू, त्याकडे आयुक्तांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे याबाबत पुणे जिल्हाधिकारी नवन किशोर राम यांच्याकडे तक्रार केली असून सदरील बांधकामाची चौकशी करुन संबंधित अधिकारी, ठेकेदारावर कडक कारवाई करावी, अशी मागणी रिपब्लिकन युवा मोर्चाचे शहर उपाध्यक्ष भारत मिरपगारे यांनी केली आहे.