माजी खासदार गजानन बाबर यांची मागणी
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील पथारीवाले व विक्रेत्यांना महापालिका प्रशासनाकडून हॉकर्सचे परवाने मिळाले असूनही, त्यांचे अद्यापही हॉकर्स झोनमध्ये पुनर्वसन झालेले नाही. अशा परिस्थितीत महापालिका प्रशासनाकडून होणारी कारवाई थांबवून, या पात्र पथारीवाल्यांचे नागरीवस्तीमध्येच कायमस्वरुपी पुनर्वसन करावे, अशी मागणी माजी खासदार गजानन बाबर यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. याबाबत महापालिकेचे प्रभारी आयुक्त किरण गित्ते यांना निवेदन दिले आहे.
पथारीचालकांचे सर्वेक्षण करावे
या निवेदनात म्हटले आहे की, न्यायालयाच्या निर्देशानुसार, देशात राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यानुसार, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्यावतीने शहरातील पथारीचालकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. या सर्वेक्षणात पात्र ठरलेल्या पथारीचालकांना ओळखपत्र देण्यात आली आहेत. याशिवाय हॉकर्स झोनदेखील निश्चित करण्यात आले आहेत. मात्र, अद्यापही या पात्र पथारीचालकांचे कायमस्वरुपी पुनर्वसन करण्यात आलेले नाही. अशा परिस्थितीत महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्यावतीने शहरातील पात्र फेरीवाल्यांवरदेखील चुकीच्या पद्धतीने कारवाई केली जात आहे. ही कारवाई थांबविण्यात यावी. तसेच केंद्र शासनाच्या धोरणानुसार, शहरातील नागरीवस्तीमधील हॉकर्सझोनमध्ये हातगाडी, पथारीवाले, झुणका भाकर केंद्र यांचे पुनर्वसन करावे.